- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबईत रोज सुमारे 7200 टन कचरा तयार होतो.मुंबई महानगर शून्य कचरा मुक्त यशस्वीपणे अंमलबजावणी होण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य आवश्यक आहे.मुंबई महानगर पालिकेच्या प्रयत्नाने अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधून ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करून शून्य कचराप्रणाली राबवण्यात येत असले तरी कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्माण करण्यासाठी कंपोस्ट पिट असणे गरजेचे आहे.मुंबईत 227 नगरसेवक असून 24 वॉर्ड आहेत.जर नगरसेवक निधीतून कंपोस्ट पिट खाजगी सोसायट्यांना मिळाल्यास मुंबई महानगर कचरामुक्त होऊन शून्य कचरा मोहिम खासगी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लोकसहभागातून प्रभावीपणे राबवता येईल, असा दावा शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 62 चे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी लोकमतशी बोलतांना केला. त्यामुळे मुंबई कचरामुक्त करण्यासाठी खाजगी इमारतींच्या आवारात कंपोस्ट पिट उभारण्यासाठी नगरसेवक निधीतून आर्थिक तरतूद करावी अशी आग्रही मागणी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी उपमुख्य अभियंता( घ.न.क)प्रचालने यांच्याकडे गेल्या 4 मे च्या पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात नगरसेवक निधी मिळण्याबाबत राज्य शासनाची परवानगी आवश्यक असून राज्य शासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात येत असून सदर अनुमती प्राप्त झाल्यावर आपल्या मागणीचा विचार करण्यात येईल असे उत्तर उपमुख्य अभियंता (घ.न.क) प्रचालने सुनील सरदार यांनी गेल्या 28 जून रोजी नगरसेवक पेडणेकर यांना पाठवले असल्याची माहिती त्यांनी दिली.