पर्यटन स्थळाच्या प्रतीक्षेत ‘दाभोसा’
By admin | Published: July 28, 2014 12:21 AM2014-07-28T00:21:13+5:302014-07-28T00:21:13+5:30
जव्हार तालुक्यातील दाभोसा ग्रामपंचायत १४०० लोकसंख्येची असून, अजूनही हे गाव सिमेंटच्या घरांपासून दूर आहे. ग्रामीण भाग असूनही १००पेक्षा जास्त गुरे नाहीत
पंढरीनाथ कुंभार, भिवंडी
पावसाळा सुरू झाला की माणसाला निसर्गाची ओढ लागते. शहरात सिमेंटच्या जंगलात राहणारा निसर्गप्रेमी नागरिक हिरव्या पालवीबरोबर पाण्याचे झरे, नदी, ओढे आणि धबधबे यांच्यामागे धावत असलेला पाहून शासनाने व लोकप्रतिनिधींनी अशा निसर्गप्रेमींसाठी माळशेज घाट, खंडाळा व लोणावळा आदी मुंबईजवळच्या ठिकाणी विविध सुविधा निर्माण केलेल्या आहेत. मात्र जव्हारमधील दाभोसा धबधब्याचे निसर्गप्रेमींना आकर्षण असूनही येथे पर्यटन उपयोगी सुविधा नसल्याने जिल्ह्यातील आदिवासींप्रमाणे हा भरभरून वाहणारा धबधबा दुर्लक्षित झाला आहे.
जव्हार तालुक्यातील दाभोसा ग्रामपंचायत १४०० लोकसंख्येची असून, अजूनही हे गाव सिमेंटच्या घरांपासून दूर आहे. ग्रामीण भाग असूनही १००पेक्षा जास्त गुरे नाहीत. दाभोसाचे सरपंच शंकर भोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनरेगासारख्या योजनेने लोकांना आळशी बनविले आहे. मजुरीच्या रोजंदारीपेक्षा दुधदुभते व कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून येथील आदिवासी स्वत:चा उत्कर्ष करू शकतात; परंतु जागृती नसल्याने व योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याने येथील आदिवासींचा उत्कर्ष होऊ शकलेला नाही. दाभोसा गाव उंचावर असल्याने नदी, नाले, ओढ्यांमधून वाहत आलेले पावसाचे पाणी दाभोसा गावाजवळील दरीत कोसळताना फारच रम्य वाटते. भरपूर पाऊस झाल्यानंतर या पाण्याच्या वेगाने कोसळणाऱ्या धबधब्याचा आविष्कार पहाण्यासारखा असतो. हा आविष्कार पाहण्यासाठी व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह इतर भागांतूनही पर्यटक ‘वन डे टूर’ करण्यासाठी येतात. परंतु या दाभोसा परिसरात इतर आकर्षण नसल्याने ते जास्त वेळ रमत नाहीत. या पर्यटकांना या निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होण्यासाठी शासनाने विशेष उपक्रमांद्वारे गणपतीपुळेच्या कोकण दर्शनाप्रमाणे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय, आदिवासी कलांचे प्रदर्शन व विक्रीकेंद्र उभे करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणारी बाजारपेठ उभी केली पाहिजे. त्यामधून वनौषधी, मसाल्याचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांचे उत्पादन विक्री झाल्यास या परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन निर्माण होऊ शकते. आदिवासी महोत्सवसारखे विविध उपक्रम राबविले तर आदिवासी चालीरितींचा परिचय नवीन पिढीला होणे शक्य आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात पर्यटक नवीन काहीतरी शोधत असतात. त्यांना नावीन्यपूर्ण काही मिळाल्यास आदिवासी पट्ट्यात पर्यटकांचा ओघ नक्कीच वाढेल. आदिवासींचा विकास केवळ कागदांवर करण्यापेक्षा जिल्हा नियोजन समिती आणि शासनाच्या आदिवासी कल्याण विभागाने येथील स्थळे पर्यटनासाठी विकसित करून जव्हार तालुक्याचा पर्यटनातून विकास करण्याचा प्रयत्न करावा, असे दाभोसा धबधब्यांवर भेट देणाऱ्या पर्यटकांना वाटते. त्रिपूर्णा धरण झाल्यास भुशी डॅमप्रमाणे तेथेदेखील पर्यटकांची गर्दी होईल.