मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा नुकतीच सुरू करण्यात आली. या सेवेत पासचीही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा लागणार असल्याची माहिती रेल्वेच्या क्रिस या संस्थेकडून देण्यात आली. सध्या मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेल्या पेपरलेस मोबाइल तिकीट सेवेला अजूनही अल्प प्रतिसाद मिळत असून प्रतिसाद वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात रेल्वे स्थानकांवर मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आली. मात्र ही सुविधा सुरू होताच प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका होईल, अशी आशा होती. परंतु मोबाइलवर तिकीट आल्यानंतरही त्याची प्रिंट स्थानकातील एटीव्हीएमवर घ्यावी लागत असल्याने प्रवाशाना त्याचा मनस्ताप होत होता. त्यामुळे यात बदल करण्याचा निर्णय घेत रेल्वेकडून पेपरलेस मोबाइल तिकीट सेवा ८ जुलै रोजी पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आली. तिकीट घेण्यासाठी रेल्वेकडून भौगोलिक क्षेत्र निर्धारित करताना ज्या स्टेशनवरून प्रवाशाला प्रवास करायचा आहे त्याच्या दोन किलोमीटर परिसरात प्रवाशाने असावे. तसेच स्टेशन इमारत परिसर किंवा ट्रॅकपासून ३0 मीटरच्या बाहेर असणे गरजेचे आहे. ही सेवा सुरू होताच पश्चिम रेल्वेवर नवी प्रणाली डाऊनलोड करण्याचे प्रमाण अधिक झाले. मात्र त्यात प्रवाशांचा गोंधळ होत असल्याने त्याचा वापर कसा करावा हे प्रवाशांना शिकविण्याचे मार्ग आम्ही शोधत आहोत. ही सेवा सुरू करण्याचे काम क्रिस संस्थेकडे आहे. त्याविषयी मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, सध्या पेपरलेस तिकीट सेवा सुरू आहे. पास सुविधाही त्यावर देण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र प्रथम चेन्नईत त्याची चाचणी घेतली जाईल. यासाठी साधारणपणे दोन महिने लागतील. त्याची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईत पास सेवा सुरू केली जाईल. आता पेपरलेस मोबाइल तिकिटाला प्रवाशांकडून अल्प प्रतिसादच मिळत आहे. हा प्रतिसाद वाढावा यासाठी आमच्याकडून भर दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मोबाइल तिकीट अॅप रेल्वेकडून मागील वर्षी सुरू करण्यात आले. ही सेवा सुरू होताच आतापर्यंत १ लाख ३३ हजार जणांकडून ते डाऊनलोड करण्यात आले. यातून जवळपास पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर ४00 ते ५00 प्रवासी तिकीट काढत असल्याचे बोभाटे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवर पेपरलेस तिकीट सुविधेतूनही ४00 ते ५00 प्रवासी तिकीट काढत आहेत.
मोबाइल पाससाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा
By admin | Published: August 06, 2015 2:33 AM