हेटवणे प्रकल्पातील पाण्याची प्रतीक्षा संपेना
By Admin | Published: January 5, 2015 10:27 PM2015-01-05T22:27:33+5:302015-01-05T22:27:33+5:30
पेण तालुक्यातील शेतकरी हेटवणे मध्यम प्रकल्पातून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गासाठी आणलेले पाइप गेलीे नऊ वर्षे पडून आहेत.
आविष्कार देसाई ल्ल अलिबाग
पेण तालुक्यातील शेतकरी हेटवणे मध्यम प्रकल्पातून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गासाठी आणलेले पाइप गेलीे नऊ वर्षे पडून आहेत. त्यातील काही पाइप शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेपट्ट्याने ेघेऊन तेथे ठेवले आहेत, मात्र ठेकेदाराने भाडे थकविल्याने पैसेही नाहीत आणि पाणीही नाही अशी अवस्था आहे.
पेण तालुक्यातील मळेघर-कांदळेपाडा येथील हनुमान हिरु पाटील यांची जागा भाडेपट्ट्याने घेतलेली आहे. त्यांच्या जागेचे एक वर्षापासून भाडे थकलेले आहे. भाड्याची रक्कम अदा करावी आणि जागेतील पाइप काढावेत, अशी मागणी हनुमान पाटील यांनी आज लोकशाही दिनात केली. त्याबाबतीत लवकरच सर्वेक्षण करुन पाटील यांचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाचे ए.डी. रोकडे यांनी लोकशाही दिनात सांगितल्याचे उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पेण तालुक्यासह अलिबाग आणि रोहे परिसरातील भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी सरकारने हेटवणे प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. वर्षानुवर्षे या प्रकल्पाचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. कामार्ले येथून १ ते १२ किमीपर्यंत संयुक्त कालवा, १३ ते २५ किमीपर्यंत उजवा तीर कालवा आणि १३ ते ३० किमीपर्यंत डावा तीर कालवा जातो. या प्रकल्पातून एक हजार १२४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे धोरण आहे. आतापर्यंत संयुक्त कालवा पूर्ण झाला आहे, तर उजव्या तीर कालव्याचे काम प्रगतीपथावर आहे. डावा तीर कालव्यामध्ये १३ ते १८ किमीच्या पट्ट्यात पाणी आलेले असल्याची माहिती हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाचे आश्विन पवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.
पेण तालुक्यात ५२ गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाची मागणी ग्रामस्थांनी नोंदविणे गरजेचे आहे. तेव्हा पेण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपेल, अन्यथा पाण्याची चोरी प्रस्तावित कंपन्या करतील असे, श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी लोकमतला सांगितले.
सरकारने सेझ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींना जास्त दर दिला होता, तर हेटवण्यासाठी तो तुटपुंजा होता, त्यामुळे ग्रामस्थांनी प्रकल्पाला जमीन देण्यास विरोध दर्शविला होता.
दरम्यान, हेटवणे मध्यम प्रकल्पाची कामे रखडली असल्याने आणलेले पाइप जागच्याजागीच पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरेत पाणी दिसत नसून पाइप दिसतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतीत गांभीर्याने लक्ष घालून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावल्यास अलिबाग, पेण आणि रोह्याची शेती सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल.
हेटवणेची टक्केवारी
हेटवणे प्रकल्पाची पाणी क्षमता१४७.४९ द.ल.घ.मी.
उपयुक्त पाणीसाठा १४४.०० द.ल.घ.मी.
निव्वळ पाणी १३७.०० द.ल.घ.मी.
बिगर सिंचन पाणी वापर ५७.३५ द.ल.घ.मी.
पाण्याचे विभाजन खालीलप्रमाणे
सिडको ३६.५० द.ल.घ.मी.
नवी मुंबई १८.२५ द.ल.घ.मी.
पेण-वाशी (वाड्या, वस्त्या) ००.३३ द.ल.घ.मी.
पेण नगर पालिका ०२.२७ द.ल.घ.मी.
सिंचनासाठी पाणी वापर ८०.२७ द.ल.घ.मी.