विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 06:28 AM2024-06-28T06:28:36+5:302024-06-28T06:28:55+5:30

ठाकरे म्हणाले, सरकार आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की, यापुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही.

Waive the debts of farmers before assembly elections Uddhav Thackeray's demand to the state government | विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी

विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा; उद्धव ठाकरे यांची राज्य सरकारकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डबल इंजिन सरकारने आजपर्यंत घोषणा आणि थापांचा पाऊस पाडला असला तरी अंमलबजावणीचा दुष्काळ हे कायमचे झाले आहे. सरकारला जराही संवेदना असतील तर ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता किती झाली ते सांगावे, असे थेट आव्हान देत विधानसभा निवडणुकीपूर्वी  शेतकऱ्यांना कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

ठाकरे म्हणाले, सरकार आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की, यापुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. पण त्यांची पंचतारांकित शेती आहे. राज्यात नव्हे तर देशात असा दुसरा कोणी शेतकरी नसेल जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो. विशेषतः अमावास्या आणि पौर्णिमेला वेगळे पीक काढतात. 

अर्थसंकल्प हा ‘गाजर संकल्प’ 
- निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून अर्थसंकल्पात जो काही घोषणांचा पाऊस पडेल ते पाहता  हा अर्थसंकल्प ‘गाजर संकल्प’ असणार आहे.
- केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे महागळती सरकार आहे. कारण राम मंदिराच्या गाभाऱ्यात गळती होत आहे. पेपरफुटी झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

लाडका भाऊ योजनाही आणा
मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना हे सरकार आणत आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. पण मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका, ‘लाडका भाऊ’ म्हणून योजना आणा, मुलींप्रमाणे मुलांनाही मदत करा. मात्र, या योजनेची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे देऊ नका, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

महायुती सरकारने महाराष्ट्र कर्जात बुडवला : नाना पटोले 
महायुती सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर वाढवून ठेवला असून, विकासाच्या नावाखाली कर्ज काढून भ्रष्ट मार्गाने मलिदा खाल्ला जात असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारीवर बोलताना गुरुवारी केली. सरकारने जागतिक बँकेसह इतर बँकांकडूनही कर्ज काढले असून, महायुती सरकारने राज्यावर २.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढवून ठेवले आहे. एमएमआरडीएसारखा विभाग नफ्यात होता. तोही आता तोट्यात आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे असतानाही घाट्यात कसा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.    
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, असे खासदार संजय राऊत म्हटले होते. त्यावर विचारले असता, राऊत यांच्या विधानावर भाष्य करणार नाही. विधानसभा निवडणुकीला सगळ्यांनी एकत्रितपणे  सामोरे जावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे ते म्हणाले. 

Web Title: Waive the debts of farmers before assembly elections Uddhav Thackeray's demand to the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.