प्रदूषणाविरोधात जागे व्हा, चळवळीत सहभागी व्हा; पर्यावरण कार्यकर्त्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 02:30 AM2020-02-08T02:30:06+5:302020-02-08T09:49:46+5:30
स्वच्छ हवेसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ०.००१४ टक्के तरतूद
मुंबई : संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत स्वीडनच्या १६ वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग हिने पर्यावरणाच्या हानीबाबत केलेल्या भाषणांमुळे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ ही चळवळ उभी राहिली.
पर्यावरण संवर्धनाचा लढा आता मुंबईतही लढला जात आहे. दादर येथे शुक्रवारी फ्रायडेज फॉर फ्युचरअंतर्गत पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मुंबईकरांना पुन्हा एकदा पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले, शिवाय मुंबईकरांना या चळवळत सहभागी होण्याचे आवाहन केले़ केंद्रीय अर्थसंकल्पात स्वच्छ हवेच्या वाट्याला एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ ०.००१४ टक्के रक्कम आल्याने खंतही व्यक्त केली.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, देशातील १२ महत्त्वाच्या शहरांपैकी ११ शहरांतील हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे
प्रमाण अधिक आहे. दरवर्षी वायुप्रदूषणामुळे १२ लाख लोकांचा मृत्यू होत आहे.
विशेषत: दिल्लीप्रमाणे आता मुंबईदेखील प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पात स्वच्छ हवेसाठी ४ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद एकूण अर्थसंकल्पाच्या ०.००१४ टक्के आहे. परिणामी, पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. बिझनेस हब म्हणून ओळख असलेले वांद्रे-कुर्ला संकुल अधिकाधिक प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. या शिवाय अंधेरी, चेंबूर आणि माझगावसारखे परिसरही प्रदूषणाच्या यादीत नोंदविले जात आहेत. नवी मुंबईतल्या प्रदूषणातही दिवसागणिक वाढत होत आहे.
दरम्यान, दुसरीकडे उत्तर प्रदेशातील लखनऊ व कानपूर आणि महाराष्ट्रातील नाशिक व पुणे या शहरांमध्ये ‘टेरी’तर्फे पुढील चार वर्षांसाठी क्लीन एअर प्रोजेक्ट इन इंडिया या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या शहरांमधील हवेचा दर्जा उंचाविण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. वायुप्रदूषणासाठी कारणीभूत विविध स्रोतांचा मागोवा घेण्यासाठी उच्च दर्जाचा विभागवार अभ्यासही हाती घेतला जाईल.
चिखिल कालमेघ, हृतिक उप्पाला आणि पूजा दोमाडिया ही युवापिढी मुंबईतून पर्यावरण संवर्धनासाठी आवाज उठवित आहे.
च्चळवळ, लढा हा क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृती व्हावी, यासाठी सुरू आहे. ग्बलोबल स्ट्राइक तीन महिन्यांनी होत असतात. ८ मार्चपासून दर शुक्रवारी सर्वसाधारण ग्लोबल स्ट्राइक केले जातात. ग्बलोल स्ट्राइक प्रत्येक स्टेशनवर होतात. नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाते.