- कुलदीप घायवट।
मुंबई : कुर्ला येथील भागात कमी दाबाने पाणी येणे, गढूळ पाणी येणे अशा पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. कुर्ला भागात रात्रीच्यावेळी तर धारावीमध्ये पहाटे पाणी येत असल्याने रहिवाशांना झोप मोडून पाणी भरावे लागत आहे, अशी तक्रार रहिवाशांनी मांडली आहे.
कुर्ला पश्चिम येथील त्रिमूर्ती सेवा मंडळ, तकिया वॉर्ड भागात अनेक दिवसांपासून अशुद्ध पाणी येत आहे. या भागात काही ठिकाणी जास्त तर काही भागात कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे रहिवाशांना पाणी भरण्यासाठी अडचण येत आहे. तकिया वॉर्डमध्ये रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत पाणी येते. त्यामुळे महिला वर्गाला रात्री जागून पाणी भरावे लागते. त्यामुळे महिला वर्गाला जागरण अनेक व्याधी होत आहे.
धारावी आणि कुर्ला या भागात अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्याने रहिवाशांना गढूळ पाणी भरण्याची वेळ आली आहे. धारावी बस डेपो समोरील राजीव गांधी नगर परिसरातील रहिवासी पाणी भरण्यासाठी उघड्या जलवाहिनीवर पाणी भरण्यासाठी गोळा होतात. धारावीतील प्रत्येक भागात पहाटे ४ ते ६, सकाळी ६ ते ८, सकाळी ९ ते १२, वेगवेगळ््या वेळी पाणी येत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.
रहिवासी योजना शितोळे यांनी सांगितले की, काही वेळा जेवण जेवायची वेळ आणि पाणी येण्याची वेळ एकच होते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी जेवण सोडून पाणी भरावे लागते. रहिवासी कोकीळा रामटेके यांनी सांगितले की, पाणी रात्रीच्यावेळी येत असल्याने झोप होत नाही. पाणी येण्याची वाट बघावी लागते. पाणी आल्यावर पाणी भरावे लागते. त्यामुळे रात्री उशीराने झोपावे लागते. फरीदा पठाण यांनी सांगितले की, सर्वांसाठी पाणी महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांना पाणी समान मिळणे आवश्यक आहे. कुर्ला भागात काही ठिकाणी कमी दाबाचे पाणी तर काही ठिकाणी जास्त दाबाचे पाणी येते. रात्री पाणी भरण्यासाठी उठावे लागते, त्यामुळे पित्ताचा त्रास होतो. जास्तवेळ जागरण झाल्यास दुसऱ्या दिवशी डोके दुखीला सामोरे जावे लागते. रहिवासी बानोबी शेख यांनी सांगितले की, पाणी आल्याने पंप मशीन लावून घरातील सर्व भांडी भरून टाकतो.
सर्व परिवाराला काहीवेळेला पाणी पुरत नाही. दत्तात्रय सणस यांनी सांगितले की, पाणी गढूळ येते. यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे.