मुंबई : पूर्व उपनगरातील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला गुरुवारी भल्या पहाटे लागलेली आग रात्री ऊशिरापर्यंत विझली नसल्याचे महापालिका नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. मात्र या आगीमुळे पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, घाटकोपर आणि देवनार परिसरात उठलेल्या आगीच्या धूरामुळे दिवसभर वातावरण प्रदूषित झाले होते.देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने महापालिका नियंत्रण कक्षाला गुरुवारी पहाटे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दिली. महापालिका नियंत्रण कक्षानेही ही माहिती प्राप्त झाल्यानंतर सर्व आपत्कालीन नियंत्रण कक्षांना सजग केले. शिवाय अग्निशमन दलाच्या वतीने डम्पिंग ग्राऊंडवर लागलेली आग विझविण्यासाठी घटनास्थळी ४ पाण्याचे टँकर आणि ३ फायर ब्रिगेडच्या गाड्या धाडण्यात आल्या. मात्र डम्पिंग ग्राऊंडच्या मध्यभागावरील कचऱ्याला आग लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवताना जवानांना अडथळे आले. आगीपर्यंत पोहचणेच कठीण होत असल्याने रात्री ऊशिरापर्यंत आग भडकतच होती. दरम्यान सकाळीच लागलेल्या आगीचा धूर देवनारसह कुर्ला, घाटकोपर आणि चेंबूर परिसरातील वातावरणात मिसळला होता. परिणामी येथील वातावरण प्रदूषित झाल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या असून, या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम शुक्रवारीही सुरुच राहणार आहे, असे महापालिका नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.
देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील आग विझेना
By admin | Published: January 29, 2016 1:32 AM