Join us  

अभिनेता मकरंद अनासपुरेची घरासाठी पायपीट

By admin | Published: October 17, 2015 2:45 AM

विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी दिवसरात्र एक करीत

यदु जोशी, मुंबईविदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यासाठी दिवसरात्र एक करीत असलेले सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यावर स्वत:च्या घरासाठी मात्र पायपीट करण्याची वेळ आली आहे.अभिनेते मकरंद मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचे तर त्यांची पत्नी शिल्पा (पूर्वाश्रमीच्या शिल्पा विचारे) यांचे माहेर गुहागरचे. माहेरची ओढ आणि ऋणानुबंध कायम राहावेत म्हणून गुहागरच्या समुद्रकिनारी टुमदार घर बांधण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं. त्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी १३०० चौरस मीटरचा भूखंड विकत घेतला. घरबांधणीसाठी दोन वर्षांपूर्वी गुहागर नगर परिषदेकडे अर्जदेखील केला. पण कोस्टल रेग्युलेटरी झोन म्हणजे सीआरझेडचे कारण पुढे करत नगरपरिषदेने तो अर्ज महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीकडे पाठविला. मात्र, कोस्टल अ‍ॅथॉरिटीने ३१ आॅगस्टच्या बैठकीत अनासपुरे दाम्पत्यांचा बांधकाम परवाना नाकारला. अनासपुरे यांची जागा समुद्रसपाटीपासून २०० ते ५०० मीटर अंतरादरम्यान येते. तसेच, ज्यांच्या नावे ही जागा आहे, त्या शिल्पा अनासपुरे येथील मूळ रहिवासी नाहीत. त्यामुळे मूळ रहिवासी वा परंपरागत व्यावसायिक मच्छीमार समाजाच्या व्यक्तीबाबत नियम शिथिल करण्याचा फायदा त्यांना देता येणार नाही, असे अ‍ॅथॉरिटीने म्हटले आहे. याबाबत मकरंद म्हणाले, कोस्टल अ‍ॅथॉरिटीने अर्ज संपूर्णत: फेटाळलेला नाही. ३१ आॅगस्टच्या बैठकीनंतर काही उणिवा दूर करून आम्ही नव्याने प्रस्ताव दिला आहे. सीआरझेडच्या चौकटीत राहून परवानगी मिळू शकते, अशी आमची भूमिका आहे. अ‍ॅथॉरिटीला ती मान्य होईल, अशी आमची अपेक्षा आहे.