पायी चालत देणार पाणी वाचविण्यासह चालण्याचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:29 AM2020-01-05T05:29:44+5:302020-01-05T05:29:52+5:30
धावण्यापेक्षा चालणे हे मानवी आरोग्यासाठी उत्तम असते.
मुंबई : धावण्यापेक्षा चालणे हे मानवी आरोग्यासाठी उत्तम असते. म्हणूनच माणसांनी जास्तीत जास्त चालावे, यासाठी रतन भट्टाचार्य यांनी मुंबई ते नाशिक असा प्रवास शनिवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू केला. एकूण २२० किलोमीटरच्या प्रवासादरम्यान ‘खूप चाला’, तसेच जलशक्ती अभियानांतर्गत ‘पाणी वाचवा’चा संदेश देत जनजागृती केली जाणार आहे.
रतन भट्टाचार्य म्हणाले की, मी अॅथलॅटिक असून, गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आहे. चालणे ही माझी जिद्द आहे, तसेच चालणे हे आरोग्यासाठी हितकारक असून, यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. त्यामुळे प्रत्येक वयोगटातील माणसांनी चालणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
जगभरातील माणसांवर कामाच्या अतिभार पडत असून, यामुळे ते तणावग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचे शरीर पूर्णपणे थकून जाते. थकलेल्या शरीरासाठी चालणे, चांगली झोप आणि वेळेवर जेवण घेणे आवश्यक असते. माणसाने जास्तीत जास्त चालावे, याकरिता जनजागृतीसाठी शनिवारी पहाटे ४च्या सुमारास पायी चालत सीएसएमटी येथून नाशिकच्या रेल्वे स्थानकाकडे रवाना झालो आहे, असे त्यांनी सांगितले.
>पाण्याचे मूल्य समजून घ्या - रतन भट्टाचार्य
जलशक्ती अभियानांतर्गत लोकांनी पाण्याचे महत्त्व जाणून घ्यावे, पाण्याचे मूल्य समजून घ्यावे. काही गावांमध्ये पाणीच नसल्याने तेथील गावकऱ्यांना पाण्याच्या एका थेंबाचेही महत्त्व माहीत आहे. मात्र, शहरात चोवीस तास पाणी उपलब्ध असल्यामुळे शहरातील लोक पाण्याला इतके महत्त्व देत नाहीत. पाण्याची बचत आता केली, तर पुढे पाणीटंचाईला सामोरे जाण्यापासून वाचणे शक्य होईल. त्यामुळे जलशक्ती अभियानांतर्गत ‘पाणी वाचवा’ हादेखील संदेश दिला जाणार आहे. माझे मित्र मितेशभाई यांनी माझ्यासोबत दादर येथून ठाण्यातील माजीवाडापर्यंतचा जवळपास ३० किमीचा चालत प्रवास केला, अशीही माहिती रतन भट्टाचार्य यांनी ‘लोकमत’ला दिली.