स्कायवॉकचा वॉक : सुरक्षेमुळे मुंबईत पादचारी विचारेनात; गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा झाला अड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 05:35 AM2018-12-24T05:35:30+5:302018-12-24T05:39:09+5:30
कोट्यवधी रुपये खर्च करून, मुंबईत विविध ठिकाणी स्कायवॉक उभारले गेले. त्यामुळे अनेक कंत्राटदार कोट्यधीश झाले. मात्र 'पादचा-यांच्या सोयीसाठी' उभारण्यात आलेल्या स्कायवॉककडे पादचा-यांनी पाठ फिरवल्याचे सध्याचे चित्र आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून, मुंबईत विविध ठिकाणी स्कायवॉक उभारले गेले. त्यामुळे अनेक कंत्राटदार कोट्यधीश झाले. मात्र 'पादचा-यांच्या सोयीसाठी' उभारण्यात आलेल्या स्कायवॉककडे पादचा-यांनी पाठ फिरवल्याचे सध्याचे चित्र आहे. त्याचा वापर पादचाºयांऐवजी गर्दुल्ले, भिकारी, प्रेमी युगुलेच अधिक करत आहेत. या स्कायवॉकच्या सद्य:स्थितीचा घेतलेला आढावा...
- अजय परचुरे
मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील पादचारी वापरासाठी मुंबई स्कायवॉक प्रोजेक्ट स्कायवेजची मालिका आहे. स्कायवॉक हे मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांना किंवा इतर मोठ्या प्रमाणावरील व्यवसायिक क्षेत्रांशी जोडतात. रेल्वे स्थानके ही भयंकर गर्दीची असतात. तेव्हा रेल्वे स्थानकापासून बस स्थानक, टॅक्सी स्टँड, रिक्षा स्टँड, शॉपिंग मॉल अशा ठिकाणी थेट पोहोचण्यासाठी सोपे पडावे, म्हणून स्कायवॉक ही संकल्पना २००८ साली मुंबईत पहिल्यांदा अस्तित्वात आली.
मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रात एकूण ३६ स्कायवॉक आहेत. मुंबईत सर्वात प्रथम पहिला स्कायवॉक २४ जून, २००८ मध्ये वांदे्र स्टेशनपासून कलानगर जंक्शनपर्यंत उभारण्यात आला. हा स्कायवॉक तब्बल १.३ किलोमीटर आहे. हा मुंबईतील सर्वात जास्त वापरला जाणारा स्कायवॉक असून, दररोज तब्बल १ लाख पादचारी या स्कायवॉकचा वापर करतात. मुंबई हे एक पादचारी-वर्चस्व असलेले शहर आहे, जेथे ६० टक्के प्रवास पादचारी चालूनच करतात. पादचाºयांना स्थानकांपासून बाहेर पडल्यानंतर सुलभरीत्या बाहेर पडण्यासाठी २००३ मध्ये एमएमआरडीए आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (एमएसआरडीसी) उपाय म्हणून एक एलिव्हेटेड व्हॉकवे प्रस्तावित केले गेले. पादचाºयांना सुरक्षित आणि मुक्त प्रवासाहासाठी सुलभ पडावेत, म्हणून स्कायवॉक संकल्पना समोर आल्याची माहिती एमएमआरडीएचे प्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली.
एमएमआरडीएने १ ते २ मैलांच्या लांबीच्या पहिल्या टप्प्यात ५० स्कायवॉक तयार करण्याची योजना केली. पहिले १८ स्कायवॉक महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी)ने बांधले होते. या प्रकल्पात विद्याविहार पश्चिम, कांजुरमार्ग, बांद्रा पूर्व न्यायालय, बांद्रा पूर्व के. एन., घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, बांद्रा पश्चिम, दहिसर पूर्व, दहिसर पश्चिम, उल्हासनगर पूर्व, उल्हासनगर पश्चिम, सांताक्रुझ पूर्व, सांताकु्रझ पश्चिम, चेंबूर, बोरीवली पश्चिम, अंधेरी पूर्व, ग्रँट रोड, विलेपार्ले, भांडुप पश्चिम, कॉटनग्रीन, विद्याविहार पूर्व, विक्रोळी पश्चिम, सायन, वडाळा, गोरेगाव पश्चिम आणि कांदिवली पूर्व या ठिकाणी मुंबईत स्कायवॉक बांधण्यात आले आहेत.
सांताक्रुझ पश्चिम येथील स्कायवॉक हा २.५ किलोमीटरचा सर्वात मोठा स्कायवॉक आहे. वांद्रे ते कलानगरपर्यंतचा स्कायवॉक हा मुंबईत सर्वात जास्त वापरला जाणारा स्कायवॉक आहे, तर ग्रँट रोड येथील स्कायवॉक हा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा असून, त्याचे बजेट ५ लाख होते. वडाळा, वांद्रे आणि सांताक्रुझ येथे सुमारे १ लाख लोक स्कायवॉक वापरतात. चेंबूरआणि बोरीवली येथे स्कायवॉक सुमारे ५० हजार वापरतात. अंधेरी, गोरेगाव, कांजुरमार्ग,भांडुप, कांदिवली, सायन, ग्रँट रोड येथे स्कायवॉकचा वापर फार कमी प्रमाणात होतो.
स्कायवॉकची रुंदी ३ मीटर आणि ७ मीटर दरम्यान असते, तर लांबी २०० मीटर आणि २००० मीटर दरम्यान असते. अडथळ्यांना टाळण्यासाठी प्रवाशांना अनेक प्रवेश आणि निर्गमन पॉइंट प्रदान केले जातात. स्कायवॉकद्वारे बेकायदेशीर क्रॉसिंगवर निर्बंध आणण्यात आले आहेत. पावसाळ्यात हे पादचाºयांसाठी आश्रयस्थान म्हणून काम करतात. वरिष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट आणि बसण्याची व्यवस्था पुरविली जाते. वाहतूक उपकरणांमध्ये अग्निशमन उपकरणे आणि सेवा नलिकादेखील पुरविल्या जातात.
स्कायवॉक उरले टाइमपासपुरते, फेरीवाल्यांसाठी लाभदायक
- खलील गिरकर
मुंबई : मोठा गाजावाजा करत व अवाढव्य खर्च करून उभारण्यात आलेले स्कायवॉक केवळ टाइमपास करण्यासाठी भटकणाºयांच्या हक्काचे ठिकाण बनले आहेत. भांडुप व घाटकोपर येथील स्कायवॉकची परिस्थितीदेखील फारशी वेगळी नाही.
भांडुप येथील रेल्वे स्थानकाजवळील पूर्व व पश्चिम भागाला जोडणाºया स्कायवॉकवरून प्रवास करणाºयांची संख्या अतिशय तुरळक आहे. या स्कायवॉकवर एका विक्रेत्याने आपला व्यवसाय थाटला असून रेल्वे स्थानकाच्या पुलावरून जाणाºया प्रवाशांंवर लक्ष ठेवून त्याचा व्यवसाय सुरू आहे. स्कायवॉकची काही ठिकाणी दुरवस्था झाली असून दोन सांध्यांना जोडणाºया ठिकाणी टाइल्स निघाल्या आहेत. स्कायवॉकच्या छताच्या आतील बाजूने अवैध पद्धतीने जाहिरातीचे स्टिकर लावून छताच्या आतील भागाचे विद्रूपीकरण करण्यात आले आहे. हा स्कायवॉक भांडुप रेल्वे स्थानकाच्या पुलाला जोडलेला आहे. मात्र त्याचे उतरण्याचे ठिकाण लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दुतर्फा देण्यात आले आहे. प्रवाशांना रिक्षाने प्रवास करायचा असल्यास त्यांना रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा स्टँडमध्ये रांग लावावी लागते.
स्कायवॉकने एलबीएस मार्गावर गेल्यावर रिक्षा मिळण्याची शक्यता दुरापास्त होत असल्याने प्रवाशांना रिक्षा प्रवास करण्यासाठी स्कायवॉकखालील भागातून चालत जावे लागते. या ठिकाणी नेहमी फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू असल्याने नेहमी गर्दी असते. स्कायवॉकच्या खालील भागातील पिलरवर चारही बाजूंनी जाहिराती लावण्यात आल्या आहेत. पिलरजवळील रिकाम्या भागाचा वापर स्थानिक फेरीवाल्यांकडून सामान ठेवण्यासाठी करण्यात येत आहे. या ठिकाणी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. व्यापाºयांनी सामान ठेवण्यासाठी व गर्दुल्ल्यांनी झोपण्यासाठी याचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे.
घाटकोपर येथील स्कायवॉकची अवस्थादेखील फारशी वेगळी नाही. घाटकोपर स्कायवॉक हा मध्य रेल्वेच्या पुलावरून बाहेर पडण्यासाठी पूर्व व पश्चिम दोन्ही दिशेने समांतर जोडलेला आहे. पश्चिमेकडे स्कायवॉकवर प्रवेश करण्यासाठी असलेल्या जिन्याची दुरवस्था झालेली आहे. जिन्यांच्या पायºयांवरील टाइल्स व सिमेंट पूर्णत: निघालेले असल्याने या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या स्कायवॉकचा वापर करणाºयांची संख्या अतिशय कमी असून महाविद्यालयीन तरुण-तरुणींकडून या स्कायवॉकचा काही प्रमाणात वापर केला जात आहे. अनेक प्रेमी युगुले निवांत क्षण अनुभवण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र सर्वसाधारण नागरिकांची संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच आहे. दोन्ही स्कायवॉकवर कोणत्याही प्रकारे सुरक्षा व्यवस्था नसून एकही सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेला नाही. त्यामुळे व्यापाºयांनी तात्पुरता गाळा म्हणून वापर सुरू केल्याची स्थिती आहे.
स्कायवॉक बनवण्यात आला असला तरी त्यावरून जाणाºयांची संख्या किरकोळ असल्याने मोठ्या संख्येने नागरिक स्कायवॉकखालून जाणे पसंत करतात. त्यामुळे आमच्या व्यवसायावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. -आशिष यादव, फळ विक्रेता, भांडुप
स्कायवॉक बांधून सरकारने निधीचा अपव्यय केला आहे. त्याचा वापर करणाºयांची संख्या अतिशय कमी असल्याने आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला नाही. - संजय कनोजिया, पान विक्रेता
स्वयंचलित पायºया बंदावस्थेत
- चेतन ननावरे
मुंबई : ग्रँट रोड रेल्वे स्थानकाहून नाना चौकात जाण्यासाठी तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या स्कायवॉकचा प्रवाशांकडून चांगला वापर होत असल्याचे निदर्शनास आले. नियोजनबद्ध रचनेमुळे प्रवाशांना ग्रँट रोड स्थानक गाठण्यासाठी रस्ता ओलांडण्याची तसदी घ्यावी लागत नाही. मात्र, स्कायवॉकच्या सर ईश्वरदास मेन्शनकडे उतरणाºया स्वयंचलित पायºया गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याचा रोष स्थानिक व्यक्त करतात.
स्कायवॉकच्या उद्घाटनानंतर सुरुवातीचे काही दिवस स्वयंचलित पायºया सुरू होत्या. मात्र, त्यानंतर त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, याच रस्त्यावर मणिभवन, गिरगाव चौपाटीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा आणि पर्यटनस्थळांचा समावेश आहेत.
परिणामी, वृद्ध नागरिक, अपंग आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागेल. दरम्यान, स्कायवॉकवर स्वच्छता असल्याचे निदर्शनास आले. सुरक्षारक्षक तैनात असल्याने अद्याप फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांच्या प्रादुर्भावापासून स्कायवॉक दूर असल्याचे दिसले.
गर्दुल्ले आणि प्रेमी युगुलांचा अड्डा
कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाला जोडणाºया हा स्कायवॉक एका दिशेला काळाचौकी, तर दुसºया दिशेला फेरबंदर परिसराला जोडतो. यामधील काळाचौकीच्या दिशेने जाणाºया स्कायवॉकचा पुरेपूर वापर कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाचा वापर करणाºया प्रवाशांना होतो. याउलट फेरबंदरच्या दिशेने जाणाºया स्कायवॉककडे प्रवाशांना पाठ फिरवल्याचे दिसते. बहुतांश प्रवाशी बॅरिस्टर नाथ पै मार्ग ओलांडून प्रवास करणेच पसंत करतात.
जी. डी. आंबेकर मार्गावरून बॅरिस्टर नाथ पै मार्गावर स्कायवॉक उतरवल्याने प्रवाशांसाठी तो निरर्थक असल्याचे स्थानिक सांगतात. इतका उंच स्कायवॉक चढून-उतरणे नरर्थक वाटत असल्याचे प्रवासी सांगतात.
सुरक्षेचा अभाव
- मनीषा म्हात्रे
मुंबई : मुंबईत उभारलेले बहुतांश स्कायवॉक हे ओसाड अवस्थेत असल्याने या ठिकाणी प्रेमी युगुलांचा वावर वाढला. अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद करून त्यांना धमकाविण्याच्या घटना घडत आहेत. ड्रग्ज माफिया, गर्दुल्ल्यांचे हे स्कायवॉक अड्डा ठरू लागले. याचा फटका एकट्या महिला, वृद्धांना बसत आहे. त्यामुळे छेडछाडीच्या घटनांनी डोके वर काढले. याच घटनांबरोबर काही स्कायवॉकचा वापर आत्महत्येसाठी झालेला दिसून आला आहे. सुरक्षेअभावी भांडुप, विद्याविहार, वांद्रे, चेंबूर या ठिकाणच्या स्कायवॉकचा रात्री-अपरात्री वापर करण्यास नागरिक घाबरतात. दिवसाही अशीच परिस्थिती असते. त्यामुळे असे स्कायवॉक मुंबईकरांबरोबर पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरताना दिसताहेत. एखादी घटना घडल्यास सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांअभावी अशा आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण होते. अनेक स्कायवॉकवरील अंधाराचा फायदा गुन्हेगारांना होतो. प्रेमी युगूल, गर्दुल्यांवर पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे.
स्कायवॉकवरील गुन्हेगारी, गैरवर्तन तसेच अपघाताच्या घटना थांबविण्यासाठी स्कायवॉक उभारतानाच त्याच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. स्कायवॉकवर प्रकाशाबरोबर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी. शिवाय त्याच्या दोन्ही बाजूस सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. जेणेकरून भविष्यात होणारे धोके टाळता येतील, असे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.
भटकी कुत्री, गर्दुल्ले आणि भिकाºयांचे अतिक्रमण
- सचिन लुंगसे
मुंबई : सायन, विद्याविहार स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती केली जात नाही. दोन्ही स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. जिन्यांची अवस्था वाईट असून, स्वच्छतेचा अभाव आहे. विद्याविहार येथील स्कायवॉकचा तुरळक वापर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून केला जात असून, सायन येथील स्कायवॉकचा तुरळक वापर नागरिकांकडून केला जात आहे. या स्कायवॉकवर भटकी कुत्री, गर्दुल्ले आणि भिकारी यांनी अतिक्रमण केले आहे.
विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला जेथे स्कायवॉक उतरतो, तेथील खांबांची दुरवस्था झाली आहे. जिन्याच्या पायºयांवरील लाद्या उखडल्या आहेत. तेथील भागावर सिमेंट टाकून तो भाग भरण्यात आला आहे. पायºया निसरड्या झाल्या असून, स्कायवॉकचा जिना उतरतो तो भाग उंच-सखल आहे. जिना उतरतो तेथील भाग सिमेंट, फुटपाथ किंवा रस्त्याचा असणे गरजेचे आहे. परंतु येथील भागात मातीचा थर आहे. परिणामी पावसाळ्यात पादचारी वर्गास अडचणींना सामोरे जावे लागते. उर्वरित काळात जेथे जिना उतरतो तेथे कचºयाचा ढीग जमा झालेला असतो. जिना अत्यंत अरुंद आहे. परिणामी एका वेळेस केवळ तीन व्यक्तींनाच प्रवेश करता येतो. येथून रेल्वे स्थानकापर्यंत जाताना लाद्या उखडल्याचे दिसते.
स्कायवॉकचा रंग उतरला आहे. विद्यार्थी सोडले तर स्कायवॉकचा वापर फार कोणी करत नाही. विद्याविहार पूर्वेला तिकीट घरापासून राजावाडी रुग्णालयाच्या रस्त्यापर्यंत जेथे स्कायवॉक उतरतो, तेथील जिनाही वाईट अवस्थेत आहे. तुटलेल्या लाद्यांनी जिन्याचा भाग भरण्यात आला आहे. पूर्वेकडील स्कायवॉकच्या ठिकाणी वरच्या भागात तिकीट घरासाठी जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. मात्र ही जागा तिकीट घराच्या प्रतीक्षेत आहे. स्कायवॉकवर स्थानिक नागरिक वॉकसाठी येत असून, भटक्या कुत्र्यांसह गर्दुल्ले आणि भिकारी यांनी या स्कायवॉकवर आपले बस्तान मांडले आहे.
सायन येथील स्कायवॉकचा पसारा मोठा असला तरी या स्कायवॉकचा वापर फार केला जात नाही. स्कायवॉक अस्वच्छ असून, भटक्या कुत्र्यांनी स्कायवॉकवर अतिक्रमण केले आहे. भिकाºयांकडून स्कायवॉकचा वापर झोपण्यासाठी केला जात असून, त्यांच्याकडून येथे अस्वच्छता केली जात आहे. स्कायवॉकची स्वच्छता ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी ते पुरेसे नाहीत. मुळात येथील स्कायवॉकचा वापरच नागरिकांकडून केला जात नाही. परिणामी संपूर्ण दिवस येथील स्कायवॉक रिकामाच असतो.
स्कायवॉकच्या दर्शनी भागाकडे लक्ष केंद्रित केले असता स्कायवॉकवर जाहिराती झळकल्याचे निदर्शनास येते. जाहिरातीमधून प्रशासनास उत्पन्न प्राप्त होत असले तरी स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. विद्याविहार आणि सायन येथील दोन्ही स्कायवॉकच्या खांबांवर अनधिकृतरीत्या जाहिराती लावण्यात आल्या असून, त्या काढण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. स्कायवॉकचा खालचा भाग अस्वच्छ असून, येथील स्वच्छतेबाबत प्रशासन काहीच बोलत नाही. सायन आणि विद्याविहार या दोन्ही स्कायवॉकचे जिने जेथे उतरता तेथील भागात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. एकंदर स्कायवॉकची अवस्था वाईट असून, प्रशासन देखभाल दुरुस्तीकडे लक्ष कधी देणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
स्कायवॉकचा वापर करत असलेले नागरिक राकेश पाटील याबाबत म्हणाले की, वांद्रे येथील स्कायवॉक वगळला तर मुंबईतील बहुतांशी स्कायवॉकचा पुरेपूर वापर केला जात नाही. विद्याविहार येथील स्कायवॉकचा वापर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून केला जातो. मात्र हे प्रमाण कमी आहे. सायन येथील स्कायवॉकचा वापर करण्याचे प्रमाण अत्यंत किरकोळ आहे. दोन्ही स्कायवॉकच्या स्वच्छतेबाबत प्रशासन पुरेशी काळजी घेत नाही. येथे भिकारी, भटकी कुत्री येणार नाहीत याची काळजी घेतली जात नाही. सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे. मात्र तेही नेमले जात नाहीत.