Join us

जलदिनानिमित्त ‘वॉक फॉर वॉटर’

By admin | Published: March 16, 2017 3:22 AM

जागतिक जल दिनानिमित्त मुंबईकरांमध्ये पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी २२ मार्चला वॉक फॉर वॉटर या सामाजिक संस्थेने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मुंबई : जागतिक जल दिनानिमित्त मुंबईकरांमध्ये पाण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी २२ मार्चला वॉक फॉर वॉटर या सामाजिक संस्थेने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गिरगाव चौपाटी, वरळी आणि पवईतील हिरानंदांनी गार्डन येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमांत मुंबईची डबेवाले संघटनाही सामील होईल, अशी माहिती संस्थेच्या एल्सी गॅब्रियल यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.गॅब्रियल म्हणाल्या की, जगभरातील ४० विविध देशांत संस्थेतर्फे जलजागृती कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. गेल्या २ महिन्यांपासून संस्था देशातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना जलसाक्षरतेचे धडे देत आहे. यंदा देशातील २० टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी आतापर्यंत २ लाख २५ हजार युवकांनी संस्थेकडे जनजागृती कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.मुंबईकरांना पाणी बचतीबाबत साक्षर करण्यासाठी पार पडणाऱ्या या विशेष कार्यक्रमात मुंबईचे डबेवालेही सामील होणार आहेत. डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ मेदगे म्हणाले की, पाच हजार डबेवाल्यांच्या माध्यमातून २ लाख ग्राहकांपर्यंत पाणी बचतीचा संदेश पोहोचवला जाईल. त्यासाठी जेवणाच्या डब्यामध्ये पाणी बचतीचा संदेश देणारे पत्रक ठेवले जाईल; शिवाय २२ मार्चला डबेवाले पाणी बचतीचा संदेश देणारे टी-शर्ट परिधान करून रस्ता आणि रेल्वेंमधून जनजागृती करताना दिसतील. (प्रतिनिधी)