वॉकर घेऊन आईची बचावासाठी धडपड, सिलिंडरच्या स्फोटामुळे काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 08:45 IST2018-12-29T07:20:22+5:302018-12-29T08:45:13+5:30
घराच्या हॉलमध्ये आग पसरली होती आणि धुराचे लोट येत होते... सर्व धूसर दिसत होते, मात्र त्याही परिस्थितीत वॉकर घेऊन एक-एक पाऊल टाकत मृत्यूच्या दाढेतून जीव वाचविण्यासाठी आई धडपडत होती
![Walker taking walker; Strike for mother's rescue; Insert time for Cylinder bombardment]] | वॉकर घेऊन आईची बचावासाठी धडपड, सिलिंडरच्या स्फोटामुळे काळाचा घाला Walker taking walker; Strike for mother's rescue; Insert time for Cylinder bombardment]] | वॉकर घेऊन आईची बचावासाठी धडपड, सिलिंडरच्या स्फोटामुळे काळाचा घाला](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/DEATH_201707438.jpg)
वॉकर घेऊन आईची बचावासाठी धडपड, सिलिंडरच्या स्फोटामुळे काळाचा घाला
मुंबई : घराच्या हॉलमध्ये आग पसरली होती आणि धुराचे लोट येत होते... सर्व धूसर दिसत होते, मात्र त्याही परिस्थितीत वॉकर घेऊन एक-एक पाऊल टाकत मृत्यूच्या दाढेतून जीव वाचविण्यासाठी आई धडपडत होती, मात्र माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच सिलिंडरच्या झालेल्या ब्लास्टमुळे मृत्यूने तिला गाठले. पाणावलेल्या डोळ्यांनी हतबल अवस्थेत विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी सांगत होते.
चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील सरगम वसाहतीत गुरुवारी रात्री आग लागली. या आगीत संजय जोशी यांची आई सुनीता जोशी (७२) यांचा मृत्यू झाला. जोशी यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री एका कामाकरिता मुलुंडला गेलो होतो, मात्र आग लागल्याचे कळताच चेंबूर गाठले. त्याच परिस्थितीत घरातील सदस्यांचा जीव वाचविण्यासाठी गेलो, मात्र धुराचे लोण पसरले होते. काहीच दिसत नव्हते. घराच्या हॉलमध्ये आग पसरत होती, संपूर्ण काळोख होता. या परिस्थितीत बाबांना कसेबसे बाहेर काढले. पण आईला चालण्यासाठी वॉकरचा आधार लागायचा, ती प्रयत्न करत होती... देव्हाऱ्यात असलेल्या निरंजनाच्या प्रकाशात आई वॉकर घेऊन बाहेर यायचा प्रयत्न करत होती, पण तितक्यात सिलिंडरचा ब्लास्ट झाला आणि काही समजण्याच्या आतच होत्याचे नव्हते झाले.
यंत्रणा सक्षम नाहीच
घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात आपल्या कुटुंबीयांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी जमलेल्या हतबल नातेवाइकांनी अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याचा सूर आळवला. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग विझवण्याच्या प्र्रक्रियेदरम्यान जवानांनी घातलेले मास्क असो वा जॅकेट्स हेसुद्धा आगीत टिकाव धरू शकले नाहीत. हे मास्क आणि जॅकेट्स वितळल्यामुळे अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाले होते.
आगीत श्रीनिवास जोशी (८६), छगन सिंग हा अग्निशमन दलाचा जवान (२८) हे दोन जण जखमी झाले होते. मात्र शुक्रवारी सकाळी राजावाडी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते अन्य रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघून गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पाच मृतदेहांची शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवार दुपारनंतर नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
...अन् जीव गेला
या आगीत तरला गांगर (५२) आणि लक्ष्मीबेन गांगर (८३) या दोघा सासू आणि सुनेला मृत्यूने गाठले आहे. गांगर यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, लक्ष्मीबेन गांगर यांच्यावर अनेक वर्षे उपचार सुरू असल्याने त्या अंथरुणाला खिळून होत्या. आग लागली तेव्हा दोघीही घरी होत्या, मात्र लक्ष्मीबेन अंथरुणात असल्यामुळे दोघींनाही एकदम घरातून बाहेर पडता आले नाही. अखेरच्या क्षणापर्यंत बाहेर पडण्यासाठी तरला प्रयत्न करत होत्या, परंतु संपूर्ण घरात आग पसरल्याने त्यांना मृत्यूने कवटाळले.