Join us

आपत्तीकाळात ‘रिचेबल’ ठेवणार वॉकी टॉकी, मुंबई मनपा ७० वॉकी टॉकी घेणार भाड्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 3:03 AM

मुंबई महापालिकेची कार्यालये व रुग्णालयांना अतिरेकी कारवायांचा धोका संभवतो. या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने नागरिकांचा वावर असल्याने आपत्तीकाळात जलद संपर्कासाठी मजबूत यंत्रणा असणे अपेक्षित असते

मुंबई : मुंबई महापालिकेची कार्यालये व रुग्णालयांना अतिरेकी कारवायांचा धोका संभवतो. या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने नागरिकांचा वावर असल्याने आपत्तीकाळात जलद संपर्कासाठी मजबूत यंत्रणा असणे अपेक्षित असते, पण मोबाइल यंत्रणा अशा काळात फेल जात असल्याने पालिकेने ७० वॉकी टॉकी भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे ८० लाख रुपये भाडे पालिका मोजणार आहे.मुंबई शहरास असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन रुग्णालये व प्रसूतीगृहे येथे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सुमारे २०० वॉकी टॉकी खरेदी करण्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. दोन ठेकेदारांनी यास प्रतिसाद दिला. मात्र, त्यांच्याकडे केंद्र सरकारच्या ‘वायरलेस प्लॅनिंग अ‍ॅण्ड कोआॅर्डिनेटिंग विंग’ची परवानगी नसल्याने त्या निविदा रद्द करण्यात आल्या. निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्याने शेवटी महापालिकेने भाड्याने वॉकी टॉकी घेण्याचे निश्चित केले.त्यानुसार परळ येथील केईएम रुग्णालय, लोकमान्य टिळक रुग्णालय व नायर रुग्णालय आदी ठिकाणी मे. लिंकवेल टेलिकॉम सर्व्हिसेस यांच्याकडून भाडेतत्त्वावर वॉकी टॉकी घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तीन पाळीत काम करणाºया सुरक्षारक्षकांच्या काही ठरावीक कालावधीनंतर बदल्या होतात. त्यांना ही माहिती देण्यास वॉकी टॉकीमुळे सोपे होईल, असे प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करताना स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका