Join us

स्वच्छतागृहांसाठी फिरती यंत्रणा हवी

By admin | Published: October 06, 2015 4:59 AM

मुंबईतील तीनही उपनगरीय मार्गांवरील सर्व स्वच्छतागृहे स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फिरती यंत्रणा निर्माण करण्याची सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी केली.

मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय मार्गांवरील सर्व स्वच्छतागृहे स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फिरती यंत्रणा निर्माण करण्याची सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी केली.सांताक्रूझमधील खोतवाडी येथील त्रिरत्न प्रेरणा मंडळ या स्वयंसेवी संस्थेतर्फे लोकसहभागातून गेली १३ वर्षे चालविण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहाला राज्यपालांनी भेट देऊन संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांसाठी स्वच्छ व सुस्थितीत असणारी सार्वजनिक स्वच्छतागृहे पुरेशा संख्येत नसल्यामुळे मुंबईसारख्या महानगरात महिलांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. लोकसंख्येच्या जवळजवळ ५० टक्के वाटा असणाऱ्या आपल्याच माता, भगिनी व मुलींच्या मूलभूत नैसर्गिक गरजेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे सांगतानाच मुंबईत सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी अधिक स्वच्छतागृहे निर्माण करण्याची सूचनाही राज्यपालांनी केली.मुंबईत मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती करण्यासाठी एक विस्तृत आराखडा तयार करण्याची सूचनादेखील राज्यपालांनी या वेळी केली. अनेक सफाई कर्मचारी टीबीसारख्या गंभीर रोगांना बळी पडतात, अनेक जण वयाची पंचेचाळिशीही गाठत नाहीत याकडे लक्ष वेधून स्वच्छता अभियान यशस्वी करावयाचे असल्यास शासनाने सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य, कल्याण व निवारा या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीन्द्र कुलकर्णी यांनी या वेळी केले. या वेळी सफाई कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे रमेश हरळकर, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अधिकारी सीमा रेडकर तसेच ‘राइट टू पी’ आंदोलनाच्या कार्यकर्त्या मुमताज शेख यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)