Join us

पाऊले चालती लायब्ररीची वाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:13 AM

फेब्रुवारीची गुलाबी हवा आता कॅम्पसमधून गायब होऊन अभ्यासाचे बोचरे वारे वाहू लागले आहेत. पुढच्या महिन्यात अथवा एप्रिलमध्ये सुरू होणा-या परीक्षांची तयारी आता जोरदार सुरू झाली आहे

मुंबई : फेब्रुवारीची गुलाबी हवा आता कॅम्पसमधून गायब होऊन अभ्यासाचे बोचरे वारे वाहू लागले आहेत. पुढच्या महिन्यात अथवा एप्रिलमध्ये सुरू होणा-या परीक्षांची तयारी आता जोरदार सुरू झाली आहे. टिंगल-टवाळी, मजा-मस्तीचा ‘फेस्टिव्हल मोड’ आता अभ्यासाकडे सरकताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कॉलेजमध्ये जरा ‘सिरीयस’ वातावरण निर्माण झाले आहे.  सकाळच्या ७च्या लेक्चरलाही आता हाउसफुल्ल गर्दी दिसू लागली आहे. परीक्षेआधी दिल्या जाणाºया ‘आयएमपी नोट्स’साठी विद्यार्थ्यांची पावले आता क्लासरूम, लायब्ररी आणि झेरॉक्सवाल्याकडे वळली आहेत. ‘सेकंड टर्म’चा अभ्यासक्रम आता फक्त काही दिवसांमध्ये कम्प्लिट करण्यासाठी तरुणाई सज्ज होत आहे. कट्ट्यावरची गर्दी ओसरल्यामुळे कॉलेजमधील वातावरणात बदलांचे वारे वाहू लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला काहींचे हार्ट ब्रेक झाले तर काहींची मने जुळली. पण, आता यापेक्षाही अभ्यासाशी ‘पॅचअप’ करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. अटेण्डस पूर्ण करण्यासाठी सर्व लेक्चरला बसण्याकडे तरुणांचा कल दिसून येत आहे.बॅग आता वह्या, पुस्तके आणि डब्याने जड झाल्याचे दिसून येते. सकाळी लेक्चरनंतर लायब्ररी असे बिझी शेड्युल विद्यार्थ्यांचे दिसून येत आहे. त्यामुळे कॅण्टीनमध्ये वेळ फुकट घालवण्यापेक्षा घरचा डब्याला पसंती दिली जात आहे. त्याचबरोबर या टर्मचे विषय, त्यासाठीची रेफरन्स बुक आणि नोट्सची शोधाशोध आता सुरू झाली आहे. नोट्ससाठी ‘स्टुडीयस स्टुडण्ट’ची मनधरणी सुरू झाली आहे. कट्ट्यावरची मंडळीही आता एकदम सिरीयस मोडवर असून, झेरॉक्सवाल्याकडे तुडुंब गर्दी जमलेली दिसून येते. मिळालेल्या विषयाच्या नोट्सच्या झेरॉक्सबरोबरच सध्या व्हॉट्सअ‍ॅप नोट्सलाही महत्त्व पात्र झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून इमेज, आयएमपी पॉइंट्स एकमेकांशी शेअर केले जात आहेत.तसेच, मित्रांमध्येच गुरू-शिष्याचे नाते निर्माण झालेले दिसून येते. विषयांप्रमाणे हे नाते बदलत जाते. ज्याचा विषय स्ट्राँग आहे, तो मित्र अन्य सर्वांना त्या विषयाचे शिकवतो. कमी दिवस असल्याने काही गु्रप्समध्ये टॉपिकचे वाटप झाले आहे. यामुळे गु्रप स्टडीज् सुरू झाले आहेत.व्हॉट्सअ‍ॅप गु्रपमध्येही फारवर्ड मेसेजपेक्षा अभ्यासांचे मेसेज फिरत आहेत. एकूणच काय आता अभ्यासाचा वारे कॉजेलमध्ये वाहू लागले आहे. पण, अजूनही पुरी फिल्म बाकी है... क्लायमॅक्स म्हणजे परीक्षेच्या दिवसापर्यंत यात अधिक रंग चढणार आहे.