भिंत कोसळून एक ठार
By admin | Published: May 8, 2016 03:41 AM2016-05-08T03:41:23+5:302016-05-08T03:41:23+5:30
भूमिगत पाण्याच्या टाकीच्या बाहेरील भिंतीचे काम सुरू असताना जमीन खचल्याने भिंत ढासळली. या अपघातात २ मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना शनिवारी कांजुर येथे
मुंबई : भूमिगत पाण्याच्या टाकीच्या बाहेरील भिंतीचे काम सुरू असताना जमीन खचल्याने भिंत ढासळली. या अपघातात २ मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना शनिवारी कांजुर येथे मध्ये घडली. या अपघातात एक मजूर जागीच ठार तर दुसऱ्या मजुराचा शोध सुरू आहे.
कांजुर पूर्वेकडील कर्वेनगर परिसरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पुनर्वसन वसाहत पी १ येथे भूमिगत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू होते. येथील संरक्षक भिंतीच्या बाहेरील बाजूस मे. बालाजी कन्स्ट्रक्शन्स तर्फे भूमिगत पाण्याच्या टाकीच्या बाहेरील भिंतीचे डी शटरींगचे काम सुरू होते. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करत, अधिक तपास सुरू असल्याची माहिती विनयकुमार राठोड यांनी दिली. (प्रतिनिधी)
शोधकार्यात अडचण
कुमार याचा सायंकाळपर्यंत शोध लागलेला नाही. येथील खड्डा २० फूट खोल असल्यामुळे आणि जागा अरुंद असल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे जे.सी.बी. आणि प्रोक्लेनसारखी उपकरणे तिथपर्यंत पोहोचत नसल्याची माहिती एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी दिली. कुमारचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
- शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास इंद्रजित चव्हाण आणि महेश कुमार दशरथ या भिंतीवर उभे राहून माल वाहत होते. अचानक भिंतीखालील जमीन खचल्याने दोघेही मजूर येथील ढिगाऱ्याखाली अडकले.
- घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि कांजुर मार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून इंद्रजितला बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले.