मुंबई : भांडुप येथे जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याची मोठी टाकी आहे. मात्र येथील महापालिकेच्या अधिकारी वसाहतीजवळील संरक्षण भिंत पडल्यामुळे बिबट्यांचा वावर वाढला आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली आहे. येथे तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याची मागणी स्थानिक रहिवासी व नगरसेवकांकडून होत होती. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता लवकरच येथे संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
भांडुप येथील वरिष्ठ अधिकारी वसाहत येथे अस्तित्वात असलेली दगडी भिंत गेल्या वर्षीच्या पावसात कोसळली. त्यामुळे निर्माण झालेल्या भगदाडातून बिबट्या वसाहतीमध्ये शिरतात. यामुळे स्थानिक रहिवासी हवालदिल झाले आहेत. याबाबतची तक्रार स्थानिक नगरसेवक व नागरिक वारंवार करीत असतात. त्यामुळे आता कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून येथे आरसीसी भिंत उभारण्यात येणार आहे.राजारामवाडी खिंडीपाडा बोगद्यालगत साईबाबा मंदिरासमोरील अस्तित्वात असलेली दगडी भिंतही २०१६ च्या पावसाळ्यात भूस्खलनामुळे पडली आहे. त्यामुळे या ठिकाणीही संरक्षक आरसीसी भिंत बांधण्यात येणार आहे. मात्र तुळशीवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत रस्त्याखालून चार हजार मि.मी. व्यासाची जलवाहिनी जाते. त्यामुळे कमी जागेत आरसीसी भिंत उभारावी लागणार आहे. या सर्व कामासाठी ३७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.अशी आहेत कामेतुळशी जलवाहिनी रस्ता खिंडीपाडा ते तुळशी गेट आणि राजारामवाडी येथे खिंडीपाडा बोगद्यालगत आरसीसी भिंत बांधणे, वरिष्ठ अधिकारी वसाहत येथे कम्पाउंड भिंत बांधणे, रस्ता व नाल्यांच्या कामाचाही यात समावेश आहे.