बोगद्याजवळील भिंतीची आखणी अयोग्य

By admin | Published: June 23, 2016 04:17 AM2016-06-23T04:17:27+5:302016-06-23T04:17:27+5:30

दिवा-पारसिक बोगद्याजवळ असणारी संरक्षक भिंत कमकुवत झाल्यानंतर त्याचा धोकादायक ठरणारा काही भाग मंगळवारी ब्लॉक घेऊन ठाणे पालिका आणि मध्य रेल्वेकडून पाडण्यात आला

The wall design near the tunnel is inappropriate | बोगद्याजवळील भिंतीची आखणी अयोग्य

बोगद्याजवळील भिंतीची आखणी अयोग्य

Next

मुंबई : दिवा-पारसिक बोगद्याजवळ असणारी संरक्षक भिंत कमकुवत झाल्यानंतर त्याचा धोकादायक ठरणारा काही भाग मंगळवारी ब्लॉक घेऊन ठाणे पालिका आणि मध्य रेल्वेकडून पाडण्यात आला. मात्र दुपारी तीन तासांच्या घेण्यात आलेल्या ब्लॉकमध्ये मध्य रेल्वेला मोठा फटका बसला. या सर्व घटनांची दखल घेत रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानुसार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संरक्षक भिंतीची पाहणी बुधवारी करण्यात आली. या पाहणीनंतर ठाणे पालिकेकडून आखण्यात आलेली संरक्षक भिंत ही उचित नसल्याचा निष्कर्ष रेल्वे अधिकाऱ्यांकडून काढण्यात आला.
या बोगद्यावरून दरड कोसळण्याची भीती असल्याने ३४ मीटरची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. मात्र मंगळवारी याच बोगद्याला लागून असलेल्या संरक्षक भिंतीचा काहीसा भाग कमकुमवत झाल्याचे निदर्शनास आले आणि त्यामुळे सर्व जलद लोकलच्या मोटरमनला लोकलचा वेग कमी करण्याचे आदेश देण्यात आले. तर ठाणे पालिकेने ही भिंत बांधली असल्याने रेल्वेच्या सहकार्याने ब्लॉक घेऊन त्याचे काम करण्याचा निर्णय घेतला आणि दुपारी दोन ते तीन तासांचा ब्लॉक घेण्यात आला. या सर्व घटनेची आणि गोंधळाची दखल घेत रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक सतीश कुमार पांडे, रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन कार्यकारी संचालक ब्रिजेश कुमार यांना संरक्षक भिंत आणि बोगद्याची पाहणी करण्यास पाठविले. यावेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य ट्रॅक अभियंता अजय गोयलही उपस्थित होते. संरक्षक भिंतीची पाहणी केल्यानंतर त्याची आखणी योग्य प्रकारे केली नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. घाट सेक्शनमध्ये ज्या पद्धतीने संरक्षक भिंत बांधण्यात येते त्याप्रकारे बांधण्यात आलेली नाही. ही भिंत बांधताना मोठ्या प्रमाणात काँक्रीटचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. धोकादायक ठरणारा सात मीटर लांबीचा संरक्षक भिंतीचा काही भाग बुधवारी पाडण्यात आला होता. आता उर्वरित २.५ मीटर लांबीचा धोकादायक ठरणारा काही येत्या दोन ते तीन दिवसांत हटविण्यात येईल. तर त्यानंतरच्या काही दिवसांत उर्वरित २५ मीटर लांबीच्या भिंतीचे छोटे छोटे तुकडे करून पाडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास त्याची तत्काळ माहिती रेल्वेला कळावी यासाठी बोगद्याजवळ रेल्वे कामगार तैनात करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The wall design near the tunnel is inappropriate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.