मुंबई : मालाड पूर्वेकडील पुष्पा पार्क येथे मार्च महिन्यात ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम युवासेनेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. या उपक्रमाला दोन महिने चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, एप्रिल महिन्यांपासून या माणुसकीच्या भिंतीकडे गरजवंत फिरकत नाहीत. त्यामुळे फक्त उपक्रम सुरू करून मदत होत नसते, तर उपक्रमाकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.या उपक्रमांतर्गत स्वच्छ कपडे, लहान मुलांची खेळणी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य आणि चपला अशा वस्तू दानशूरांकडून भिंतीवर टांगून ठेवण्यात येतात. या वस्तू सर्वसामान्य गरीब लोक तेथून मोफत घेऊन जातात, परंतु सद्यस्थितीला भिंतीने ‘माणुसकी’ सोडली आहे. कपडे खाली टाकून देण्यात आले आहेत, तसेच रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा अड्डा येथे झाला आहे. भिंतीवरील वस्तूंची इतकी वाईट अवस्था पाहून, कोणी गरजू इथे फिरकतही नाही, तसेच बाजूला रिक्षा स्टँड असल्याने रिक्षाचालक तिथे कोणालाही उभे राहू देत नाहीत.युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य रूपेश कदम यांनी या संदर्भात सांगितले, दोन ते तीन दिवसांनी कार्यकर्ते कामावरून आल्यावर, माणुसकीच्या भिंतीकडे जातात आणि सर्व वस्तू जागेवर निटनेटक्या स्थितीत ठेवतात. मात्र, वस्तू घेण्यासाठी येणारे लोक सर्व नियोजन बिघडवतात. त्यामुळे वस्तू इतरत्र पडलेल्या दिसतात. वस्तू देणारेही शिस्तीत ठेवत नाहीत. त्यामुळे हा पसारा झाला आहे. काही दिवसांत कार्यकर्त्यांची नेमणूक येथे करण्यात येईल. जेणेकरून, माणुसकीच्या भिंतीवर लक्ष राहील आणि अस्वच्छता निर्माण होणार नाही.
माणुसकीच्या भिंतीची दुरवस्था, मालाडमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 7:09 AM