भिंत करणार तिवरांचे रक्षण

By admin | Published: May 20, 2017 04:14 AM2017-05-20T04:14:11+5:302017-05-20T04:14:11+5:30

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई भागांमधील तिवरांची जंगले नष्ट होत आहेत. परिणामी, तिवरांची जंगले वाचवण्यासाठी वनविभागाने कांदळवनांच्या हद्दीच्या

The wall will protect you | भिंत करणार तिवरांचे रक्षण

भिंत करणार तिवरांचे रक्षण

Next

- अक्षय चोरगे । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह नवी मुंबई, ठाणे आणि वसई भागांमधील तिवरांची जंगले नष्ट होत आहेत. परिणामी, तिवरांची जंगले वाचवण्यासाठी वनविभागाने कांदळवनांच्या हद्दीच्या बाहेर संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांसह समाजकंटकांकडून तिवरांवर भराव टाकत बांधकाम केले जात असून, हे प्रकार थांबविण्यासह मुंबई शहरासह लगतची तिवरांची जंगले वाचविण्यासाठी वनविभागाने हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे, भिंतीच्या बांधकामांसाठी महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन विभागाकडून १०० कोटी रुपयांचा निधी वनविभागाच्या कांदळवन संरक्षण विभागाला मंजूर करण्यात आला आहे.
तिवर क्षेत्रात होणारी अतिक्रमणे, तिवरांवर टाकले जाणारे डेब्रिज; त्यामुळे तिवरांची हानी होत आहे. अशा प्रकारांमुळे तिवरे नष्ट झाली असून, हे रोखण्यासाठी भिंत बांधण्याचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी किनारा क्षेत्र व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आला होता. प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे, असे कांदळवन विभागाचे सहायक संवर्धक मकरंद घोडके यांनी सांगितले. या भिंतीच्या बांधकामासाठी परवानगी मिळाल्यानंतर याबाबतच्या निविदा मागविण्यात येतील, असे घोडके यांनी सांगितले. दरम्यान, कांदळवन संरक्षण विभागाकडून कांजूरमार्ग, घाटकोपर, माहुल, मालवणी-मालाड, चारकोप, बोरीवली, दहिसर, गोराई, मंडाले, तुर्भे, ऐरोली, वाशी, कुलाबा येथील तिवरांच्या जंगलालगत अंदाजे दहा मीटर उंचीची भिंत बांधली जाणार आहे.

तिवरांना कोंडायची गरज नाही. सागरी नियमन प्राधिकरणात अशा प्रकारे भिंती बांधण्याची तरतूद नाही. जर शासनानेच अशा भिंती बांधायला सुरुवात केली, तर अनेक बांधकाम व्यावसायिकसुद्धा अनधिकृत भिंती बांधू लागतील. अशा भिंतीमुळे लोक तिवर परिसरात बेकायदेशीरपणे बंगले आणि इमारती बांधतील.
जर अशा प्रकारे संरक्षक भिंती बांधल्या, तर पाणी अडवले जाईल. त्यामुळे तिवरांचे नुकसान होईल.
- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती

तिवरांच्या भोवती भिंत बांधण्यापेक्षा आधी मुंबईच्या सभोवती तिवरांचे किती क्षेत्र आहे, याची माहिती गोळा करायला हवी. त्यानंतर, त्याचे नकाशे, आरेखन व्हायला हवे. असे केल्यामुळे पूर्वीच्या नकाशांची तुलना करून अतिक्रमण झालेल्या जागा समजतील. आता सरसकट भिंत बांधायला सुरू केल्यास, अतिक्रमण करणाऱ्यांना एक प्रकारे मान्यता दिल्यासारखे होईल. या महिन्यामध्ये कफ परेडजवळ ११०० झोपड्या पाडण्यात आल्या, या जागी ८०० झोपड्या असल्याची माहिती पालिकेला होती, परंतु तेथे त्याहून जास्त झोपड्या आढळल्या. याचाच अर्थ, सर्वेक्षणाचे काम योग्य रितीने होण्याची गरज आहे. आता काँक्रिटची भिंत बांधली, तर अतिक्रमण करणाऱ्यांना झोपडीसाठी एका बाजूची आयती भिंत बांधून मिळाल्यासारखे होईल.
- प्रदीप पाताडे, सागरी आणि किनारी पर्यावरणाचे अभ्यासक

Web Title: The wall will protect you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.