दक्षिण मुंबईत पाण्यासाठी वणवण : माफियांचे राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 02:30 AM2019-01-07T02:30:12+5:302019-01-07T02:30:27+5:30
मुंबईच्या दक्षिण भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दक्षिण मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होते.
मुंबई : मुंबईच्या दक्षिण भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाल्याचे वास्तव समोर आले आहे. दक्षिण मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचे टँकर मागविण्याची वेळ आली आहे. तर बहुतेक ठिकाणी पाण्याची चोरी करून माफिया गब्बर होत असून सर्वसामान्यांना मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दक्षिण मुंबईतील रे रोड येथे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर वसलेल्या कौला बंदर, कोळसा बंदर, रेती बंदर या वसाहतींमध्ये हजारोंची लोकसंख्या असून पाणी माफिया येथे गब्बर झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेतर्फे येथील कौला बंदर येथे पाण्याची वाहिनी टाकून दीड महिना उलटला आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी कधी येणार, असा सवाल नागरिक उपस्थित करतात. धक्कादायक बाब म्हणजे ३५ लीटरचे कॅन भरून घेण्यासाठी नागरिकांना ८ रुपये, तर २०० लीटर पाणी क्षमता असलेला ड्रम भरून घेण्यासाठी एका वेळी नागरिकांना तब्बल ५० रुपये मोजावे लागतात.
राजरोसपणे या ठिकाणी चोरीचे पाणी विकले जात असून प्रशासन ढिम्मपणे पाण्याच्या काळाबाजाराकडे दुर्लक्ष करत आहे. वस्तीमधील प्रत्येक गल्लीतील साचलेल्या कचऱ्यातून, घरांच्या छतावरून चोरीचे पाणी पुरवठा करणारे पाइप दिसतात. ठाकूरद्वार येथील बदामवाडीमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. कमी दाबाने येणाºया पाण्यामुळे तळ मजल्यावरील नागरिक सोडून इतर मजल्यांवर राहणाºया सर्व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, अडीचशे रुपये देऊन एक किंवा दोन दिवस आड पाण्याचे टँकर मागवावे लागत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी मनोज आमरे यांनी व्यक्त केली.
अर्ज करूनही पाणी जोडणी नाही!
च्दक्षिण मुंबईतील शीव कोळीवाड्यातील संक्रमण शिबिरात पाण्याची गंभीर समस्या असल्याचे पाणी हक्क समितीचे कार्यकर्ते प्रवीण बोरकर यांनी सांगितले. बोरकर म्हणाले की, नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. चार महिन्यांपूर्वी अर्ज करूनही पाण्याची जोडणी मिळत नसल्याचा आरोपही बोरकर यांनी केला आहे.
कुलाब्यात वाट बिकट
कुलाब्यातील गीता नगरमध्ये रहिवासी संघामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. एका नळामागे सरासरी १० कुटुंबांना ३० मिनिटांत पाणी भरावे लागत आहे. त्यामुळे पुरेसे पाणीच मिळत नसल्याची खंत येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे. परिणामी, मनपाने येथे पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे.
मलबार हिलचा प्रश्न अनुत्तरितच
पाणी प्रश्नाने काहीच महिन्यांपूर्वी रूद्र रूप धारण केले होते. मंत्र्यांच्या बंगल्यांपासून मोठ्या कॉर्पोरेट कार्यालयांनाही झळ सोसावी लागली होती. अद्याप येथील बहुतेक आस्थापनांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे मनपाने येथील पाणी प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार आंदोलन करेल, अशी माहिती कुलाबा तालुका अध्यक्ष मनोज आमरे यांनी दिली.