Join us  

वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प होणार

By admin | Published: April 23, 2016 3:44 AM

अंधेरी ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) पुढाकार घेतला जात असतानाच आता पुन्हा यात बदल होणार आहेत

मुंबई : अंधेरी ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) पुढाकार घेतला जात असतानाच आता पुन्हा यात बदल होणार आहेत. एलिव्हेटेड प्रकल्प वांद्रे येथून सुरू करण्यास राज्य सरकार आग्रही असून, रेल्वे मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीनंतर प्रकल्पांच्या कामांना वेग येणार आहे. यासाठी सुधारित प्रकल्प अहवाल एका महिन्यात शासनाकडे सादर केला जाईल, अशी माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली. मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांसाठी भविष्यात फायदेशीर ठरणारे आणि महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यात शुक्रवारी बैठक पार झाली. या बैठकीत चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्प वांद्रे ते विरार आणि वांद्रे ते चर्चगेट अशा दोन टप्प्यांत पूर्ण करण्यावर चर्चा झाली. त्यामुळे प्रकल्प पुढे सरकणार यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र होणारा मेट्रो-३ प्रकल्प रेल्वेच्या चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला समांतर जात असल्याने आणि एलिव्हेटेडसाठीही जागा उपलब्ध नसल्याने एमआरव्हीसीने अंधेरी ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प बनविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी सुधारित प्रकल्प अहवालही तयार केला जाणार होता. मात्र राज्य शासनाने आता वांद्रे येथून प्रकल्प नेण्यासाठी आग्रह धरल्याने आणि त्याबाबत गुरुवारी रेल्वेमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केल्याने आता वांद्रे-विरार एलिव्हेटेड प्रकल्पावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय म्हणाले, की वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प होईल. त्यामुळे अंधेरी ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पाचा विचार होणार नाही. सुधारित प्रकल्प अहवाल आम्ही एका महिन्यात शासनाकडे पाठविणार आहोत आणि त्यानंतर राज्य सहकार्य करार होईल. दुसऱ्या टप्प्यातील वांद्रे ते विरार प्रकल्पाचा सध्यातरी विचार होणार नाही.