भटक्या कुत्र्यांची दहशत
By admin | Published: July 17, 2014 01:18 AM2014-07-17T01:18:53+5:302014-07-17T01:18:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत.
खालापूर : गेल्या काही दिवसांपासून परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. या कुत्र्यांवर निर्बंध आणण्यासाठी पालिका प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
खालापूर येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अठरा जण जखमी झाले आहेत. शहराच्या अदोशी गावातील कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच नागरिक जखमी झाले आहेत. दर आठवड्याला श्वानदंशाचा रुग्ण पालिका रुग्णालयात येत असून या घटना वाढत आहेत. श्वानदंशामुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वयोवृध्द घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.
शहराच्या वर्धमाननगर, बाजारपेठ, शास्त्रीनगर, ताकई, शिळफाटा, रहाटावडे, भानवज, काटरंग, वीणानगर, अदोशी आदी भागात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी एकत्र फिरताना आढळत असून अनेकदा पादचाऱ्यांवर भुंकणे, लहान मुलांचा पाठलाग करणे, वाहनांच्या पाठीमागे धावणे, महिलांच्या हातात पिशवी असल्यास खेचणे अशा घटना सातत्याने घडत आहेत.
शहरातील विविध भागात अशा श्वानदंशाच्या घटना घडत असताना पालिका प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. (वार्ताहर)