रोहित नाईक, मुंबईटी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सराव सामना वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात आला. हा सराव सामना असल्याने या सामन्यास नेहमीपेक्षा कमी गर्दी होईल, असा अंदाज मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) बांधला होता. परंतु, मुंबईकरांनी स्पोर्ट्स वीकेंड साजरा करण्याची संधी साधल्याने वानखेडे स्टेडियम हाऊसफुल्ल झाले होते. रात्री ७.३० वाजता खेळविण्यात येणाऱ्या सामन्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासूनच तिकिटासाठी मुंबई हॉकी असोसिएशनच्या खिडकीसमोर रांग लावली. या सामन्यासाठी ३०० व ५०० रुपयांची तिकिटे उपलब्ध होती. महिलांसाठी विशेष रांग होती. दुपारी ३.३० वाजता खेळविण्यात येणारा इंग्लंड-न्यूझीलंड आणि ७.३० वाजता सुरू होणारा भारत-दक्षिण आफ्रिका या सामन्यांची तिकिटे एकाच वेळी देण्यात येत असल्याने मुंबईकरांनी ही संधी वाया घालवली नाही. इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यावेळी काही प्रमाणात भरलेले वानखेडे स्टेडियम भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यावेळी मात्र खचाखच भरले. त्यामुळे हा सामना सराव सामना वाटतच नव्हता. दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येक विकेटवर आणि भारतीय खेळाडूंच्या प्रत्येक चौकार - षटकारावर भारतीय पाठीराखे जल्लोष करत आपल्या संघाला प्रोत्साहन देत होते.
वानखेडे हाऊसफुल्ल
By admin | Published: March 13, 2016 3:49 AM