Join us

मुंबईत घर हवे; म्हाडाचा फॉर्म भरला का? अर्ज नोंदणी, स्वीकृती प्रक्रियेला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 1:48 PM

या कालावधीत त्रयस्थांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडा प्रणालीच्या माध्यमातूनच यात सहभाग घ्यावा. नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व घर लागल्यावर रकमेचा भरणा करणे या बाबी या ऑनलाइन असणार आहेत.

मुंबई : गोरेगाव पश्चिम, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध भागातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या विक्रीसाठी आयोजित लॉटरीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते शुक्रवारी गो लाईव्हद्वारे प्रारंभ करण्यात आला.

या कालावधीत त्रयस्थांकडून घर मिळवून देतो अशा प्रलोभनांना बळी न पडता म्हाडा प्रणालीच्या माध्यमातूनच यात सहभाग घ्यावा. नोंदणी करणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, कागदपत्रांची पात्रता पडताळणी करणे, अर्ज करणे ते अनामत रकमेचा भरणा व घर लागल्यावर रकमेचा भरणा करणे या बाबी या ऑनलाइन असणार आहेत. नोंदणी प्रक्रियेनंतर अर्जदाराचे कायमस्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे. अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी प्रणालीद्वारे होणार आहे. अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील, अशी माहिती जयस्वाल यांनी दिली. 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती ४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.

बदलांच्या नोंदी अद्ययावत कराज्या अर्जदारांनी यापूर्वी लॉटरी प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला असून कागदपत्रे संगणकीय प्रणालीत अपलोड करून नोंदणी केली आहे, अशा अर्जदारांनी आपल्या त्यावेळच्या प्रोफाइलमध्ये नोंद केल्यानुसार दरम्यानच्या काळात झालेल्या बदलांच्या नोंदी अद्ययावत करावयाच्या आहेत.

जसे अर्जदार विवाहित असल्यास व पती / पत्नी यांचे उत्पन्न असल्यास दोघांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताकरिता पात्र उत्पन्न गटानुसार दोघांचे  १/४/२०२३ ते ३१/४/२०२४ या कालावधीतील आयकर विवरणपत्र अथवा कुटुंबाचा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला नव्याने अपलोड करावा. अशा अर्जदारांनी नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही व इतर कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची गरज नाही. 

टॅग्स :म्हाडासुंदर गृहनियोजन