बदली, बढती हवी? मागास भागात जा!

By admin | Published: May 17, 2017 01:08 AM2017-05-17T01:08:40+5:302017-05-17T01:08:40+5:30

वर्ग अ आणि ब च्या (राजपत्रित व अराजपत्रित) अधिकाऱ्यांना भरती, बदली आणि पदोन्नतीसाठी प्राधान्याने मागास भागांमध्ये पाठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.

Want to increase, increase? Go to Backward Area! | बदली, बढती हवी? मागास भागात जा!

बदली, बढती हवी? मागास भागात जा!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वर्ग अ आणि ब च्या (राजपत्रित व अराजपत्रित) अधिकाऱ्यांना भरती, बदली आणि पदोन्नतीसाठी प्राधान्याने मागास भागांमध्ये पाठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यानुसार मानव विकास निर्देशांकानुसार प्रत्येक विभागातील मागास जिल्ह्यांमधील पदे भरण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
या निर्णयानुसार वाटपासाठी उपलब्ध पदांमधून नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागातील मंजूर पदांच्या ८० टक्के पदे भरण्यात येतील. त्यानंतर वाटपासाठी शिल्लक २० टक्के पदसंख्येच्या ८० टक्के पदे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण एक व नाशिक या पाच महसुली विभागांत व २० टक्के पदे कोकण २ व पुणे या दोन महसुली विभागांत रिक्त पदांच्या प्रमाणात भरण्यात येतील.
सरळसेवा आणि पदोन्नतीने नियुक्तीवेळी महसुली विभागाचे वाटप करताना सर्व उमेदवारांना विभागनिहाय रिक्त पदांची संख्या कळविण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांच्याकडून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण-१, नाशिक, कोकण-२, पुणे यापैकी कोणत्याही एकाच महसुली विभागाची पसंती घेण्यात येईल.
पसंतीनुसार महसुली विभाग वाटप केल्यानंतर किंवा पसंती दिलेल्या महसुली विभागात पद उपलब्ध नसल्यास अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत गुणवत्ता किंवा निवड यादीतील क्रमांकानुसार व महसुली विभागातील पदाच्या उपलब्धतेनुसार चक्राकार पद्धतीने विभागाचे वाटप करण्यात येईल.
ज्या अधिकाऱ्याचा जोडीदार किंवा त्याचे मूल मतिमंद आहे किंवा ज्या अधिकाऱ्यांनी मतिमंद असलेल्या स्वत:च्या भावाचे किंवा बहिणीचे पालकत्व स्वीकारलेले आहे त्यांना महसूल विभाग वाटपात अपवाद करण्यात आले आहे.

बदल्यांसाठी सात विभाग
राज्यात सहा महसुली विभाग असले तरी बदल्यांच्या दृष्टीने एकूण सात विभाग करण्यात आले आहेत. कोकण १ आणि कोकण २ असे कोकणचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांचा मिळून कोकण १ विभाग असेल. बदल्या व बढत्यांवरील बदल्यांसाठी महसुली विभाग वाटपाचा प्राधान्यक्रम नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण-१, नाशिक, कोकण-२ आणि पुणे असा राहील. कोकण-२ विभागात ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर हे जिल्हे असतील.

पती-पत्नी एकत्रीकरण
पती-पत्नी एकत्रिकरणाबाबतीतही नवीन विभागानुसार बदल करण्यात आला आहे. त्यानुसार कोकण २ व पुणे महसुली विभागातून केवळ नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण १ व नाशिक हे महसुली विभागच बदलून देता येणार आहेत. आपसात महसुली विभाग बदली या कारणास्तव महसुली विभाग बदल करताना पुणे व कोकण २ महसुली विभागातून नागपूर किंवा अमरावती किंवा औरंगाबाद किंवा नाशिक किंवा कोकण १ महसुली विभागात बदलून जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रथम अशा बदलून दिलेल्या महसुली विभागात रुजू होणे आवश्यक राहणार आहे.

Web Title: Want to increase, increase? Go to Backward Area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.