बारावीचाच अभ्यास करायचा ? की प्रवेश परीक्षांचा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:36+5:302021-05-01T04:06:36+5:30
बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचा निर्णय अद्याप रेंगाळल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या बारावीच्या ...
बारावीच्या ऑफलाईन परीक्षांचा निर्णय अद्याप रेंगाळल्याने विद्यार्थी, पालक संभ्रमात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. बारावीची परीक्षा मे अखेरीस होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता एप्रिल महिना संपत आला, तरीही बारावीच्या परीक्षेबाबत अनिश्चितता कायम आहे. यामुळे अजून किती वेळ बारावीचाच अभ्यास करायचा? बारावीनंतर विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची तयारी कधी करायची ? असे प्रश्न विद्यार्थ्यांना सतावू लागले आहेत. ऑफलाईन परीक्षा होणार की नाही ? अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय स्वीकारणार का? तसेच जर लेखी परीक्षा होणार असतील तर वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक गोंधळात पडले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने हा संभ्रम वाढत आहे. यापूर्वी २३ एप्रिल ते २१ मे २०२१ दरम्यान ही परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा मे अखेरीस होईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी २० एप्रिल रोजी जाहीर केले होते. बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसाठी यंदा जवळपास १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
बारावीनंतरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीचे गुण आणि प्रवेश परीक्षेचे गुण दोन्ही महत्त्वाचे असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकार असो वा बोर्ड यांनी बारावीची परीक्षा होणार की नाही, होणार असेल तर ती कशा पद्धतीने होणार, कधी होणार, याबाबत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली जात असतानाही, कोणतेही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
बारावीच्या परीक्षेबाबत राज्य सरकार निर्णय जाहीर करणार
बारावीच्या परीक्षेबाबत शालेय शिक्षण विभाग, राज्य शिक्षण मंडळ यांच्यात वारंवार बैठका होत आहेत. राज्य शिक्षण मंडळामार्फत परीक्षेचे नियोजन करण्यात येते, परीक्षा घेतली जाते, निकाल लावले जातात; परंतु परीक्षा घ्यायची की नाही, हा निर्णय मात्र राज्य सरकार घेईल. त्यामुळे बारावीच्या परीक्षेबाबचा निर्णयदेखील राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात येईल. राज्य सरकारमार्फत आलेल्या आदेशाचे पालन मंडळाच्या वतीने करण्यात येईल, असे अधिकृत सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवरून सांगितले.