शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा...; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 09:02 AM2024-09-10T09:02:34+5:302024-09-10T09:03:03+5:30

पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे. 

Want to be a teacher? Fill the form of 'TET'...; Deadline till 30th September, Exam on 10th November | शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा...; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा

शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा...; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत, १० नोव्हेंबरला परीक्षा

मुंबई - पहिली ते आठवीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठी ९ ते ३० सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. 

राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजय राठोड यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक या पदांसाठी उमेदवार टीईटी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. राज्यात पवित्र संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याची भरती अंतिम टप्प्यात आहे, तर दुसऱ्या टप्प्यात काही हजार पदे भरली जाण्याची शक्यता आहे. 

मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल. निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात येईल. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा उमेदवार प्रमाणपत्रे सादर करू न शकल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल. 

खोटी माहिती भरल्यास कारवाई

टीईटी २०१८ आणि २०१९मधील गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपले नाव या यादीत आहे किंवा नाही, याबाबत तपासणी करून वस्तुनिष्ठ माहिती अर्जात भरावी. 

भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील. २०१८, २०१९च्या गैरप्रकार केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव असूनही खोटी माहिती भरून परीक्षा दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

वेळापत्रक असे...

अर्ज भरण्याचा कालावधी : ९ ते ३० सप्टेंबर 
प्रवेशपत्र मिळण्याचा कालावधी : २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर
परीक्षेची तारीख : १० नोव्हेंबर 
वेळ : पहिला पेपर - सकाळी १०:३० ते १:००
दुसरा पेपर : दुपारी २:०० ते ४:३०

Web Title: Want to be a teacher? Fill the form of 'TET'...; Deadline till 30th September, Exam on 10th November

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा