मुंबई : महारेराने एजंटसह ग्राहकांच्या संपर्कात येणाऱ्या बिल्डरकडील कुठल्याही क्षमतेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळवणे बंधनकारक केले असून, आता रिअल इस्टेट क्षेत्रातील ४५७ एजंटस प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून २० मे रोजी राज्यात होणाऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि सोलापूर अशा १० शहरात विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
एजंट हा घर खरेदीदार आणि बिल्डर यांच्यातील दुवा असून, रेरा कायद्यामध्येही एजंट्सचे अस्तित्व अधोरेखित करण्यात आले आहे. सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात. त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी यासारख्या तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असणे गरजेचे आहे. या माहितीच्या आधारे ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.
महारेराने एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केले असून, सध्याच्या ३९ हजार एजंटसना १ सप्टेंबरपूर्वी हे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागणार आहे. शिवाय फेब्रुवारीपासून बिल्डरांच्या संस्थांसोबत इतर संस्थांनीही या अनुषंगाने अनेक कार्यक्रम आयोजित केले असून, या कार्यक्रमांना महारेरातील वरिष्ठांनी मार्गदर्शन केले आहे.