मुंबई :
वांद्रे येथे होणाऱ्या मोटारसायकल रायडिंगवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. मात्र, स्वतःचा जीव धोक्यात घालत रेस करणाऱ्या रेसर्सना पकडणे अशक्य नसले तरी तितकेच कठीण आहे. तरी अपघात घडल्यास रायडरला खाली पडण्यापासून रोखण्यासाठी मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर बसवलेल्या ब्रिफेन रोपांप्रमाणेच क्रॅश बॅरिअर्स वापरण्याची योजना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आखत होते. मात्र, वाढत्या रेस व अपघातांची संख्या पाहता लवकरात लवकर ते बसविण्यात यावे, यासाठी पाठपुरावा करत असल्याचे पॉटहोल वॉरिअर्स हॅण्डल चालविणारे समाजसेवक मुश्ताक अन्सारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मार्च, २०२३ : बडी रात आणि अपघातही बडाच !वांद्र्याच्या यू-ब्रिजच्या सुरक्षा भिंतीला धडकून सुमारे ४० फूट पुलावरून खाली पडल्याने अहात खान (१८) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. खान हा अत्यंत वेगात होता. त्याने हेल्मेटही घातले नव्हते. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर त्याच्या मागे बसलेला त्याचा १७ वर्षीय मित्र याच्यावर साबू सिध्दिकी रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेने त्याचे कुटुंबीयदेखील कोलमडून पडल्याचे त्यांचे शेजारी सांगतात.
नोव्हेंबर, २०२२ : रेलिंग तोडत खाली पडला माहिमला राहणारा चेतन कीर (१९) हा दुचाकीस्वारही वांद्रे रेक्लमेशनच्या ४० फूट यू-ब्रिजवरून खाली पडला आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याची गाडी खाली पडण्यापूर्वी तीन ते चार ठिकाणी आदळली आणि पुलाच्या बाजूचे रेलिंग तोडत खाली पडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
जून, २०१९ : ...तो थेट खाली फेकला गेला वांद्रे रेक्लमेशनजवळील यू-ब्रिजवर दुचाकीवरून जाणारा शाहीद खान (२२) या तरुणाला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. ज्यात तो यू ब्रिजवरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेला त्याचा मित्र अरबाज खान (२१) हा दुचाकीसह काही अंतर फरफटत गेला. हे दोघे मालवणीचे रहिवासी होते.
...त्या दोघींना अटकस्टंट करणारा बाईकस्वार फैयाज कादरी उर्फ फैज याच्या सोबत स्टंट करणाऱ्या दोघींना बीकेसी पोलिसांनी अखेर अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्राम अभ्यंकर यांनी रविवारी सांगितले. त्यांची नावे सिमरन कौर (२०) आणि रिया (१९) अशी आहेत. वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) रस्त्यावर हे तिघे स्टंट करताना आढळले होते. पैसे, मोबाइल, गाड्या नव्हे, श्वासांची बेटिंग !पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रेस लावणारे रायडर हे २ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत बेटिंग लावतात. अनेकदा मोबाइल तर गाड्यांसाठीही बेटिंग असते. त्यांना गाड्या पळवून इतकी सवय झालेली असते की जिवाची भीती वाटत नाही.
क्रॅश बेरियर्ससाठी पत्रव्यवहार !एमएसआरडीसीच्या अभियंत्यांची २० दिवसांपूर्वी भेट घेत क्रॅश बेरियर्सबाबत विचारणा केली. त्यावेळी ते काम जुन्या कंत्राटदाराला देण्यात येणार असल्याचे मला सांगण्यात आले. मात्र अजूनही त्यावर काम सुरू झालेले नसून रायडर्सच्या सुरक्षेसाठी लवकर उपाययोजना कराव्यात यासाठी मी महामंडळाला विनंती पत्र देणार आहे.- मुश्ताक अन्सारी, पॉटहोल वॉरियर्स एसआरडीसीला पत्र दिले आहे. आम्ही क्रॅश बॅरियर्स लावण्यासाठी आधीच एमएसआरडीसीला पत्र दिले आहे. त्यांनीही त्यासाठी तयारी दर्शविली आहे.- राजेश देवरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वांद्रे पोलिस.