मुंबई : सध्या इलेक्ट्रिक बाइक, स्कूटर आणि कारचा जमाना आहे. परंतु, चार्जिंग स्टेशन मिळेल का? गाडी वेळेत चार्ज करता येईल का, असे अनेक प्रश्न अजूनही सतावताहेत. त्यामुळे अनेकजण अजूनही इलेक्ट्रिक कार घेताना १०० वेळा विचार करतात. परंतु, आता टेन्शन घेऊ नका. कारण, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारायचे असेल तर त्यासाठी महावितरणने स्वतंत्र वेबसाइट सुरू केली आहे. तसेच महावितरणच्या पॉवरअप ईव्ही या ॲप्लिकेशनचा वापर करून वाहनचालक आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात.
वाहनाच्या चार्जिंगसाठी मोबाइल ॲपचा वापर करता येईल. या सर्व कामगिरीची दखल घेत ईव्ही चार्ज इंडिया २०२३ या इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या परिषदेत महावितरणला चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.
दरम्यान, महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी या यशाबद्दल कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही) या संस्थेचे महासचिव अजय शर्मा यांच्या हस्ते प्रसाद रेशमे यांनी महावितरणतर्फे पुरस्कार स्वीकारला.
३,२१४ चार्जिंग स्टेशन्सची उभारणीराज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने राज्यात एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. महावितरणने राज्यात स्वतःची ६२ विद्युत वाहने चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत. पुण्यात २३, ठाण्यात ११, नवी मुंबईत १२, नागपूरमध्ये सहा यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि सांगली या शहरात ही स्टेशन उभारण्यात आली आहेत. चार्जिंग स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या सप्टेंबरपासून सातत्याने वाढत आहे.