Join us

माल उचलायचायं? मग ७० रुपयांप्रमाणे पैसे दे! वेस्टर्न कोल फिल्डच्या अधिकाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 3:09 PM

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लि. कंपनीमधून ८,२०० मेट्रिक टन कोळसा उचलण्याचे कंत्राट एका कंपनीला मिळाले होते.

मुंबई : तुझ्या ऑर्डरप्रमाणे जर तुला कोळशाच्या खाणीतून माल उचलायचा असेल तर मला प्रति मेट्रिक टन ७० रुपयांप्रमाणे पैसे द्यावे लागतील. आतापर्यंत तू ४,६२३ मेट्रिक टन कोळसा उचलला आहेस. ७० रुपयांनुसार त्याचे तीन लाख २३ हजार रुपये होतात, ते आधी दे , मगच तुझ्या पुढच्या ऑर्डरनुसार तुला कोळसा उचलू देईन. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या वेस्टर्न कोल्डफिल्ड लि. कंपनीमध्ये उपविभाग अधिकारी असलेल्या गौतम बासूटकर या अधिकाऱ्याने अशी मागणी एका व्यापाऱ्याकडे केली आणि घासाघीस झाल्यानंतर पहिल्या हप्त्यापोटी एक लाख रुपये स्वीकारताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लि. कंपनीमधून ८,२०० मेट्रिक टन कोळसा उचलण्याचे कंत्राट एका कंपनीला मिळाले होते. या कोळशाची उचल करण्यासाठी कंपनीने ते काम वाहतूक व्यवसायात असलेल्या अन्य कंपनीला दिले होते. कामाच्या नियोजनानुसार ११ जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित वाहतूक कंपनीने ४,६२३ मेट्रिक टन कोळशाची उचल केली होती. मात्र, पुढील मालाची उचल करण्यासाठी वाहतूक कंपनीचे अधिकारी जेव्हा कंपनीच्या उपविभाग अधिकाऱ्याकडे ३१ जानेवारी रोजी गेले, त्यावेळी त्याने आतापर्यंत उचल केलेल्या ४,६२३ मेट्रिक टन कोळशासाठी तीन लाख २३ हजार रुपये लाचेपोटी मागितले. मात्र, घासाघीस केल्यानंतर ही रक्कम कमी करत तीन लाख १९ हजार रुपये इतकी निश्चित झाली. तसेच, लाचेपोटी एक लाख रुपयांचा प्राथमिक हप्ता देण्याचेही ठरले. दरम्यान, या संदर्भात सीबीआयकडे लेखी तक्रार केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात ३ फेब्रुवारीला सापळा रचला होता आणि जेव्हा संबंधित व्यापाऱ्याने बासूटकर या अधिकाऱ्याला एक लाख रुपये दिले. त्याचवेळी सीबीआयने त्याला रंगेहाथ अटक केली. त्याला अटक केल्यानंतर या अधिकाऱ्याच्या घरी तसेच कार्यालयात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आणि या दरम्यान त्यांना अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. 

 अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस