हेरिटेज लूक पहायचा तर, दक्षिण मुंबईला भेट द्याच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 11:01 AM2024-03-07T11:01:23+5:302024-03-07T11:03:11+5:30
येत्या काही दिवसांत दक्षिण मुंबई आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. या दिव्यांमुळे या भागाला एक प्रकारचा हेरिटेज लूक मिळणार आहे.
मुंबई : येत्या काही दिवसांत दक्षिण मुंबई आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. या दिव्यांमुळे या भागाला एक प्रकारचा हेरिटेज लूक मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ६०० पेक्षा जास्त हेरिटेज विद्युत खांब उभारणार आहे. दक्षिण मुंबईतील हेरिटेज वास्तूंची शोभा वाढवण्यासाठी पालिकेने त्यास शोभेसे हेरिटेज विद्युत खांब बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
या परिसरात ६०० पेक्षा जास्त हेरिटेज खांब बसवण्यात येणार आहेत. हुतात्मा चौक, वीर नरिमन रोडवर सर्वांत जास्त १११ विद्युत खांब उभारले जातील, तर महम्मद अली उड्डाणपूल ते सीएसटी स्थानक दरम्यान दोन्ही पदपथांवर १०४ खांब उभारले जातील.
दक्षिण मुंबईच्या ‘ए’ वॉर्डात पालिका मुख्यालय, मध्य रेल्वेचे मुख्यालय, एशियाटिक लायब्ररी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, गेट वे ऑफ इंडिया, मुंबई विद्यापीठ यांसारख्या हेरिटेज वारसा असणाऱ्या इमारती आहेत. या इमारतींच्या परिसरात सजावटही हेरिटेज आहे. दिव्यांचे खांब हेरिटेज आहेत. मेट्रो थिएटरचा चौक, हुतात्मा चौक, बॅलार्ड पिअर परिसरात हेरिटेज धर्तीचे दिवे, अर्थात विद्युत खांब आजही अस्तित्वात आहेत. त्यांची देखभाल आणि डागडुजी होत असते. हे दिवे, त्यांचे खांब यांची आकर्षक रचना पाहण्यासाठी पर्यटकांची पावले त्या ठिकाणी थबकतात. काही दिवसांत दक्षिण मुंबई आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. यासाठी महापालिका ६०० पेक्षा जास्त हेरिटेज विद्युत खांब उभारणार आहे.
या ठिकाणी उभारणी :
१) शहीद भगतसिंग मार्ग ३८
२) रिगल सिनेमा ते गेट वे ऑफ इंडिया ११
३) कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग २५
४) प्रेसिडेंट हॉटेल ते वर्ल्ड ट्रेंड सेंटर ४१
५) मोहम्मद अली उड्डाणपूल ते एम्पायर बिल्डिंग २२
६) भाई बंदरकर चौक ते दीपक जोग जंक्शन १३
७) वीर नरिमन रोड ३४
८) भाई बंदरकर चौक ते सीपीआरए गार्डन ६०
९) मंत्रालय ते एअर इंडिया ६६
१०) रिगल सिनेमा ते गेट वे ऑफ पदपथ ३३
११) भाई बंदरकर चौक ते दीपक जोग जंक्शन पदपथ ५८
१२) नेताजी सुभाषचंद्र बोस रोड ३
१३) हुतात्मा चौक, वीर नरिमन रोड १११
१४) मोहम्मद अली उड्डाणपूल ते सीएसएमटी स्थानक पदपथ १०४