बंदूक चालवायची आहे? पोलिसच देणार प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 11:57 AM2023-11-07T11:57:05+5:302023-11-07T11:57:22+5:30
बंदूक कशी हाताळायची याची पूर्ण तांत्रिक माहिती नसल्याने बरेचदा दुर्घटना घडतात. त्यावर आता प्रशिक्षणाचा उपाय शोधण्यात आला आहे.
मुंबई : बंदूक आणि त्यासाठीचा दारूगोळा बाळगायचा असेल तर राज्याच्या गृह विभागाचा परवाना लागतो. असा परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना आता पोलिसांकडून ते हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. बंदूक कशी हाताळायची याची पूर्ण तांत्रिक माहिती नसल्याने बरेचदा दुर्घटना घडतात. त्यावर आता प्रशिक्षणाचा उपाय शोधण्यात आला आहे.
गृह विभागाने सोमवारी हा निर्णय घेतला. त्यानुसार, शहर पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा राज्य राखीव पोलिस दलाकडून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. बंदुकीच्या सुरक्षेसंबंधी घ्यावयाची खबरदारी, ती कशी उघडायची, साफ कशी करायची, गोळी कशी भरायची आणि काढायची, गोळीबार करताना कोणती पोझिशन कधी घ्यायची, याचे प्रशिक्षण मिळेल.
अटी काय?
हे प्रशिक्षण तीन दिवसांचे असेल. दररोज अडीच तास प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी प्रशिक्षणार्थीला स्वत: हजर राहावे लागेल. प्रशिक्षणासाठीचे शुल्क प्रति व्यक्ती एक हजार रुपये असेल. प्रशिक्षण पूर्ण केले असल्याचे प्रमाणपत्र असणे परवान्यासाठी अनिवार्य असेल.