वेष बदलून राहणारा खूनातील आरोपी 35 वर्षानंतर लागला पोलिसांच्या हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:41 PM2021-07-27T12:41:21+5:302021-07-27T12:42:13+5:30
Wanted criminal found in Mumbai: दक्षिण मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरातून पोलिसांनी या वॉन्टेड गुन्हेगाराला पकडले.
मुंबई: मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील एका झोपडपट्टी परिसरातून 35 वर्षानंतर एका वॉन्टेड गुन्हेगाराला पकडलं आहे. आरोपीला 1986 मध्ये हत्येच्या खटल्यातून जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर अचानक तो बेपत्ता झाला होता आणि इतक्या वर्षांपासून मुंबईतील झोपडपट्टी परिसरात आपली ओळख लपवून राहायचा.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश मुरलीलाल रतन उर्फ पक्या (59) वर मानखुर्द-शिवाजनगर पोलिस स्टेशनमध्ये जुन्या वादातून एका गुंडाची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याला या प्रकरणात अटक झाली होती, पण 1986 मध्ये न्यायालयाने त्याला जामीन मंजुर केला. परंतु, जामीन मिळाल्यानंतर तो पुढील सुनावणीला कोर्टात हजर झालाच नाही. तेव्हापासून तो पोलिसांना चकवा देत होता. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केला होता.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, 35 वर्षांपूर्वी जामीनावर सुटल्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला होता. त्यावेळेस पोलिसांनी त्याचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नव्हता. तसेच, मागील 20 वर्षांपासून तो मुंबईच्या कफ परेडच्या झोपडपट्टी परिसरात आपल्या मुलासोबत राहत होता. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.