जगायची इच्छा होती; पण लाटांनी मरण दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:06 AM2021-05-21T04:06:45+5:302021-05-21T04:06:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तौउते चक्रीवादळाच्या तडाख्याने बार्ज पी-३०५ बुडत गेली तशी आम्ही सर्वांनी स्वतःला समुद्रात झोकून दिले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौउते चक्रीवादळाच्या तडाख्याने बार्ज पी-३०५ बुडत गेली तशी आम्ही सर्वांनी स्वतःला समुद्रात झोकून दिले. जेव्हा नौदलाच्या बोटी आल्या तेव्हा जगण्याची आशा निर्माण झाली. जोर लावत आम्ही तिकडे जायचो; पण येणाऱ्या लाटा आम्हाला दोनशे मीटर लांब फेकून द्यायच्या. तीन-चार तासाच्या या लंपडावाने कंटाळून आमच्यातील काहींनी स्वतःला समुद्राच्या हवाली केले. जगायची इच्छा होती; पण लाटा मरण दाखवत होत्या; पण अशातच एका लाटेने आम्हाला नौदलाच्या बोटीकडे ढकलेले आणि आम्ही वाचलो, अशा शब्दात सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांनी समुद्रात क्षणाक्षणाला चाललेला जीवनमरणाचा लपंडाव विशद केला आहे.
* पहिल्याच फटक्यात १८ जण दिसेनासे झाले
वादळाच्या तडाख्याने बार्ज बुडत होती. एक- एक अँकर तुटत होता. सायंकाळी पाचपर्यंत जेव्हा सगळेच बुडेल असे वाटत होते. तोवर बार्ज पकडून असलेलो आम्ही हिंमत करून उड्या मारायला तयार झालो. चार-पाच, दहा-बारा जण जमेल तसे हातात हात घालून सुमद्रात उडी मारली; पण लाटेच्या पहिल्याच फटक्यात आमच्यातील १७-१८ जण दिसेनासे झाले होते. वादळाच्या सूचनेनंतर आमची बार्ज ओएनजीसीच्या फलटापासून काहीशे मीटर अंतरावर ॲकर झाली होती; पण वादळाने काही तासात काही किलोमीटरपर्यंत ती भरकटली. बार्जची अशी अवस्था होती तेव्हा आमची विचारायची सोयच नव्हती, अशी माहिती अभिषेक आव्हाड यांनी दिली.
* काही जण बार्जसोबतच तळाशी गेले
सुरुवातीचे तीन-चार तास आम्ही बार्जला पकडून उभे होते; पण जसजशी बार्ज बुडत होती तसा धीर खचत होता. जगणार की मरणार काहीच कळत नव्हते. जगायची इच्छा दाटून आली तरी समोर लाटा मरण दाखवत होत्या. पाणी, वेगाचा वारा, लाटा आणि अंधाराने काहीच समजत नव्हते. बार्जचा एक भाग पूर्ण पाण्याखाली गेला होता. तेव्हा आम्ही लाइफ जाकीट घालून समुद्रात उडी घेतली; पण काहींना वाचणार नाही याची खात्री झाली, धीर खचलेले बार्जसोबतच समुद्रात बुडाल्याची वेदना विशाल केदार यांच्या शब्दातून व्यक्त होत होती.
------------------