सीमा महांगडे
मुंबई : राज्य विकास मराठी संस्थेचे कार्यालय एलफिन्स्टन तंत्र महाविद्यालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे. संस्थेचा एकूण व्याप पाहता ही जागा खूप अपुरी आहे. या पार्श्वभूमीवर आयटीआय इमारतीतील एलफिन्स्टन तंत्र महाविद्यालयाची वर्गखोली संस्थेला काही कालावधीसाठी वापरण्याची मुभा देण्यात आली. मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतर आता तेथे संस्थेचे अधिकारी वर्गखोलीचा कार्यालय म्हणून वापर करीत आहेत. यामुळे मराठीसाठी काम करणाऱ्या संस्थेलाच आयटीआयच्या दारात बसण्याची वेळ आली आहे.काही महिन्यांपूर्वी संस्थेची काही पुस्तके खराब होऊ नयेत यासाठी एलफिन्स्टन तंत्र महाविद्यालयाची वर्गखोली संस्थेला काही
कालावधीसाठी वापरण्यासाठी देण्यात यावी, असा निर्णय शिक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र या निर्णयानंतर अनेक महिने उलटूनही संस्था ही जागा सोडण्यास तयार नसल्याने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आयटीआयसाठी त्यांच्याकडे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नेमके कोठे समायोजित करावे असा प्रश्न पडला आहे. राज्य मराठी विकास संस्थेला ६ महिन्यांसाठी वर्गखोली देण्यात आली होती. त्यासंबंधी काहीही लिखित निर्देश नाहीत. मात्र आता वर्गखोलीत कार्यालयच सुरू करण्यात आल्याची माहिती एलफिन्स्टन तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य ए. जी. पवार यांनी दिली.यासंबंधी संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद कटीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, स्वत: शिक्षणमंत्र्यांनी या जागेत काम करण्याचे निर्देश दिले. संस्थेला इतर जागा उपलब्ध होईपर्यंत येथेच थांबण्यासंबंधीचे लिखित निर्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.एकीकडे राज्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी आणि मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न चालू असताना राज्य मराठी विकास संस्थेसारख्या संस्थांचे कसे आणि कुठल्या प्रकारे संवर्धन होत आहे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे. त्यामुळे सरकारने मराठी भाषा आणि शाळांसोबत या संस्थांचे संवर्धन करण्याचीही गरज असल्याचा सूर मराठीप्रेमींमधून उमटत आहे.मोठी जागा आवश्यकमराठी भाषा आणि संस्कृतीचेजतन व संवर्धनासाठी १ मे १९९२ रोजी राज्य विकास मराठी संस्थेची स्थापना करण्यात आली. मात्र संस्थेची जागा अपुरी आहे. सुसज्ज ग्रंथालय, ध्वनिप्रयोग शाळा, संगणक विभाग, व्याख्यान कक्ष, ध्वनिमुद्रण कक्ष, अभिलेख, ध्वनिफिती, चित्रफिती, लोककला नमुने जतन करण्याची व्यवस्था आदी सर्व गोष्टींसाठी संस्थेला मोठी जागा आवश्यक असल्याचे कर्मचाऱ्यांचे सुरुवातीपासून म्हणणे आहे.