व्हायचे होते पोलिस, पण बनलो अभिनेता..., सिद्धार्थ जाधवने व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 05:44 AM2023-01-07T05:44:51+5:302023-01-07T05:45:26+5:30
संमेलनाचा अखेरचा दिवस गाजला विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या मांदियाळीने. आपापल्या क्षेत्रातील प्रवासाबाबत दिग्गजांनी अनुभव कथन केले.
मुंबई : विश्व मराठी संमेलनाचा अखेरचा दिवस गाजला विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या मांदियाळीने. आपापल्या क्षेत्रातील प्रवासाबाबत दिग्गजांनी अनुभव कथन केले. त्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज अंजली भागवत, अभिनेते-लेखक संजय मोने, चित्रकार सुहास बहुळकर, लेखक, आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोले आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचा समावेश होता.
अभिनयातील आपल्या कारकीर्दीबद्दल बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाला की, खरे तर मला पोलिस व्हायचे होते; परंतु अभिनेता झालो. बालपणापासून पोलिस बनण्याच्या दृष्टीनेच वाटचाल सुरू होती. रूपारेल कॉलेजच्या नाट्य संस्कृतीने माझ्यातील अभिनेत्याला वाव दिला. रंगभूमीने आम्हा चेहरा नसलेल्या कलाकारांना आत्मविश्वास दिला. तोच आजही कामी येतो. मराठीपणाचे बिरुद मिरवायला आवडते. चित्रकार सुहास बहुळकर म्हणाले की, चार वर्षांचा असताना मी एक चित्र काढले. ते पाहून वडिलांना माझ्यातील चित्रकार दिसला. त्यावेळी फार कळत नव्हते, पण आज चित्रकला हेच जीवन बनले आहे.
छंदच करिअर बनले
नेमबाजीतील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना अंजली भागवत म्हणाली की, खेळात मला बालपणापासून रुची होती. त्यावेळी खेळाकडे करिअर म्हणून बघितले जात नव्हते, पण त्यातच नाव कमावले आहे. तीनवेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
‘मराठी ज्ञानभाषा बनवण्याचा प्रयत्न’
खरे तर मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे ढककला गेलो. असे अच्युत गोडबोले म्हणाले. गरज होती म्हणून नोकरी केली. ४९ पुस्तके लिहिली. पुस्तकांच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत पोहोचता आले. तांत्रिक भाषा सोपी करून सांगण्यासाठी सगळी पुस्तके मराठीत लिहिली आहेत. मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठीही हा प्रयत्न आहे.
यासाठी लेखनाकडे वळलो : संजय मोने
आई, बाबा, आजोबा अभिनयात असल्याने वारसा होता. अभिनयाचे संस्कार आईच्या गर्भातच झाले होते. नंतरच्या काळात भूमिका मिळणार नाहीत, असे वाटल्याने लेखनाकडे वळलो. मंगेश कुलकर्णी यांनी एकांकिकेचे लेखन करायला सांगितले आणि लेखक बनलो.