Join us

सोने स्वस्तात खरेदीची इच्छा पडली महागात, ३० लाखांची फसवणूक; चौकडी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 2:01 PM

मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकाला एक ग्रॅम सोने देऊन या सोन्याची पारख करण्यास ठग गँगच्या सदस्याने सांगत गुप्त धनातील सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले होते.

नालासोपारा : गुप्त धनातील सोने स्वस्तात देण्याच्या बहाण्याने आधी ज्येष्ठ नागरिकाचा विश्वास संपादन करून त्यानंतर त्याची फसवणूक करणाऱ्या चौकडीला विरारच्या भाटपाड्यातून अटक करण्यात आली आहे. या चौकडीत एका महिलेचा समावेश आहे.मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकाला एक ग्रॅम सोने देऊन या सोन्याची पारख करण्यास ठग गँगच्या सदस्याने सांगत गुप्त धनातील सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले होते. या ज्येष्ठ नागरिकाने एक ग्रॅम सोने पारखून घेतले असता, ते खरे असल्याचे समजले. त्यामुळे ठग गँगचा सदस्य सांगत असलेली माहिती खरी असल्याचा त्यांना विश्वास बसला आणि खरे सोने घेण्यासाठी त्यांनी ३० लाख रुपये या गँगला दिले. त्यानंतर मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे फसगत झाल्याचे कळल्यावर त्यांनी विरार पोलिस ठाणे गाठले. 

पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास केला असता, उत्तर प्रदेशातील ठग गँगने हा प्रकार केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या गँगच्या चार जणांना विरारच्या भाटपाडा परिसरातून अटक करण्यात आली. आरोपी विजयकुमार राय, विनय परमार, मणिलाल परमार आणि जीविदेवी अशी अटक करण्यात आलेल्या ठगांची नावे आहेत. त्यांच्याकडून १० लाख रुपये रोख आणि पाच किलो बनावट सोने हस्तगत करण्यात आले आहे. 

टॅग्स :सोनंपोलिसगुन्हेगारी