Join us

शिवसेना-राष्ट्रवादीतच नाइटलाइफवरून ‘युद्ध’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 7:16 AM

नाइटलाइफसाठी शिवसेना सुरुवातीपासून आग्रही आहे. मात्र भाजपच्या विरोधामुळे मंजुरी मिळूनही हा निर्र्णय अमलात आला नव्हता.

मुंबई : प्रजासत्ताक दिनापासून मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याची घोषणा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर दोन दिवसांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पोलिसांवर किती ताण पडणार आहे, याचा आढावा घेऊ. तोवर त्याची अंमलबजावणी होणार नाही, असे स्पष्ट केल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली खरी; पण रात्री आदित्य यांनी फोन करून चर्चा करताच देशमुख यांनी नव्याने टिष्ट्वट करत हे युद्ध शमवले.नाइटलाइफसाठी शिवसेना सुरुवातीपासून आग्रही आहे. मात्र भाजपच्या विरोधामुळे मंजुरी मिळूनही हा निर्र्णय अमलात आला नव्हता. मात्र आदित्य यांनी शुक्रवारी पालिकेच्या कार्यक्रमात त्याची घोषणा करून टाकल्याने गृहमंत्र्यांनी पोलिसांवरील ताणाचा, मनुष्यबळाचा विषय उपस्थित करत या योजनेला ब्रेक लावला. २२ जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आणि महाविकास आघाडीतील मतभेदही समोर आले. पुरेशी चर्चा आणि तयारी न करता ही योजना अमलात आणण्याची घाई शिवसेना करत असल्याचे चित्र उभे राहिले.या मतभेदांचा फायदा घेत भाजपने पोलिसांवरील ताण, वाहतूक पोलीस, पालिका, कामगार विभाग, अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाच्या कामाचा मुद्दा उचलून धरला. निवासी, अनिवासी भागाची व्याख्या स्पष्ट नसल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला.‘त्या’ फोननंतर बदलला सूरपोलिसांवर पडणारा ताण अभ्यासल्याशिवाय नाइटलाइफचा निर्णय घेता येणार नाही, ही गृहमंत्र्यांची ठाम भूमिका रात्री मवाळ झाली. अनिवासी भागात ही योजना राबवायची असेल, तर ही संकल्पना लवकरात लवकर प्रत्यक्षात येऊ शकेल, असे नवे टिष्ट्वट देशमुख यांनी केले. ते करताना त्यांनी आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनाही टॅग केले. दिवसभर नाइटलाइफला ब्र्रेकचे वृत्त माध्यमांत झळकल्याने सायंकाळी स्वत: आदित्य यांनी देशमुखांना फोन करून विचारणा केली आणि त्यानंतर गृहमंत्र्यांचा सूर बदलल्याचे समजते.

टॅग्स :नाईटलाईफशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेस