साथींवर प्रभावी नियंत्रणासाठी वॉर रूम; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 10:25 AM2023-08-11T10:25:02+5:302023-08-11T10:25:11+5:30
पावसामध्ये जलजन्य, कीटकजन्य आणि साथरोग बळावतात व त्यांचा उद्रेक होण्याचीही शक्यता असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रणाची आवश्यकता असून, त्यासाठी त्या भागात असलेल्या वॉर रूमला राज्यस्तरावरील वॉर रूमसोबत संलग्न करावे. त्यामुळे उपाययोजना करणे सोयीचे जाईल, अशी सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून घेतलेल्या साथरोग नियंत्रण बैठकीत दिली.
पावसामध्ये जलजन्य, कीटकजन्य आणि साथरोग बळावतात व त्यांचा उद्रेक होण्याचीही शक्यता असते. यासाठी त्या त्या संबंधित भागात वॉररूम असावी आणि त्यांनी राज्यस्तरीय वॉर रूमला तेथील आजार, रोग याबद्दल २४ तासांमध्ये माहिती द्यावी, असे ते म्हणाले.
या बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार, आरोग्य विभागाचे संचालक नितीन अंबावडेकर, तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. राज्यातील मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, आदी आजारांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला, तर जास्त रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीची कारणे व उपाययोजनांवरही चर्चा झाली.
औषधांचा पुरवठा कुठेही बाधित होता कामा नये. आवश्यक औषधांचा साठा तपासून घ्यावा, त्यानुसार नियोजन करावे. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांमार्फत शालेय मुलांची तपासणी करावी. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मलेरिया रुग्णसंख्या असलेल्या प्रभागांमध्ये उपाययोजना कराव्यात. नियमित धूर फवारणी करावी. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने बांधकाम परवानगी देणाऱ्या विभागाची मदत घेऊन पाणी न साचण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही सावंत यांनी सांगितले.