Join us

पोस्ट लसीकरणाच्या तक्रारींसाठी वाॅर रूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवसानंतर लसीकरणाच्या दुष्परिणामांविषयी सर्व स्तरांवर चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवसानंतर लसीकरणाच्या दुष्परिणामांविषयी सर्व स्तरांवर चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर आता पालिका प्रशासनाने पोस्ट लसीकरण तक्रारींसाठी वॉर रूमची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉर रूममधून लसीकरण केलेल्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येईल. त्यासाठी वॉर रूममध्ये वैद्यकीय तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोरोना लसीकरणाचे काम १६ जानेवारीपासून सुरू झाले आहे. लसीकरणानंतर संबंधित लाभार्थींना आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नयेत किंवा त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी या लाभार्थींवर थेट पालिका वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल. लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्यांना वॉर रूमचा नंबर दिला जात असून त्यांना आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवल्यास अथवा इतर समस्या जाणवल्यास ‘वॉर्ड वॉर रूम’ सातत्याने संपर्कात असणार आहे.

कोविडच्या रुग्णांना तत्काळ मदत आणि खाटा उपलब्ध होण्याकरिता पालिका आरोग्य विभागाने पालिकेच्या वॉर्डनिहाय २४ वॉर रूम कार्यान्वित केल्या आहेत. पोस्ट कोविड रुग्णांच्या मदतीव्यतिरिक्त वॉर रूम लसीचा डोस घेणाऱ्या लाभार्थींच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. लसीचा काही दुष्पपरिणाम दिसून येत असल्यास लाभार्थींनी त्याबाबतची माहिती तत्काळ वॉर्ड वॉर रूमला कळविणे गरजेचे आहे. यानंतर त्यांना तत्काळ मदत देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी २४ तास तीन शिफ्टमध्ये मदतकार्य सुरू राहणार आहे. वॉर रूममध्ये विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य वैद्यकीय कर्मचारीही लाभार्थींच्या मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत.

* आरोग्य कर्मचाऱ्यांवर ठेवणार लक्ष

लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक लसीकरण केंद्रावर साधारण अर्धा तास आरोग्य कर्मचाऱ्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली नजर ठेवली जाईल. त्यानंतर संबंधित लाभार्थी घरी गेल्यानंतर त्यांना स्थानिक वॉर्ड वॉर रूमचा नंबर देण्यात येतो. त्याचसोबत वॉर रूममध्येही लाभार्थींबाबत इत्थंभूत माहिती देण्यात येत आहे. लाभार्थींची प्रत्येक मिनिटाची अपडेट वॉर रूमच्या प्रतिनिधीला मिळणार आहे.

............................