Join us

सर्जिकल स्ट्राईकवरून युतीत वॉर

By admin | Published: October 13, 2016 6:00 AM

सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी छप्पन इंची छाती लागते. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याने ते सर्जिकल स्ट्राईक करू शकले

मुंबई : सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी छप्पन इंची छाती लागते. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याने ते सर्जिकल स्ट्राईक करू शकले, या शब्दात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचले. त्यावर, उद्धव ठाकरे यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून पंतप्रधानांची प्रशंसा केलेली असताना शेलार यांना खोकला का आला, असा चिमटा शिवसेनेच्या प्रवक्त्या आ.नीलम गोऱ्हे यांनी काढला. ‘हिंमत असेल तर आताच युती तोडा, पाठीत वार कराल तर आम्ही सर्जिकल स्ट्राईक करू’ असा इशारा ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजपाला दिला होता. त्यावर, प्रतिक्रिया विचारली असता शेलार म्हणाले की, त्यांनी (शिवसेनेने) सर्जिकल स्ट्राईकबद्दल न बोलले बरे. ती क्षमता त्यांच्यात नाही. कारण ते करायचे तर छप्पन इंची छाती लागते. मुंबई भाजपाच्या वतीने मंगळवारी मुलुंड येथील कार्यक्रमात खा.किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. शेलार यांनी आज सोमय्या यांची व अन्य कार्यकर्त्यांची भेट घेतली. माफिया राजचा रावण दहन हा भाजपाचा अधिकृत कार्यक्रम होता. ही लढाई यापुढे तीव्र होत जाईल. सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू. जशास तसे उत्तर देऊ, असे शेलार म्हणाले. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, गुजरातबद्दल विशेष प्रेम असलेले शेलार त्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेवर टीका करतात. मुख्यमंत्री बोलत नाहीत. तेच बडबड करतात. स्वत:ची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू असलेल्या नेत्याने किती बोलावे? शेलारांच्या कंपन्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना क्लीन चिट मिळालेली नाही. (विशेष प्रतिनिधी)