मनसे Vs मुंबई मेट्रो; अनिल शिदोरे आणि अश्विनी भिडेंमध्ये वृक्षतोडीवरून 'वर्ड वॉर'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 11:26 AM2019-09-11T11:26:03+5:302019-09-11T12:43:11+5:30
आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडवरुन संघर्ष
मुंबई: मेट्रोच्याआरेमधील प्रस्तावित कारशेडवरुन मनसे आक्रमक झाली आहे. आरेमध्ये कारशेड उभारल्याशिवाय मेट्रो प्रकल्प पूर्ण होऊच शकणार नाही, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी केला होता. मात्र हा दावा तर्कशुद्ध वाटत नसल्याचं मनसेनं म्हटलं आहे. यानंतर आता मेट्रोच्या कारशेडवरुन मनसे विरुद्ध अश्विनी भिडे असा संघर्ष सुरू झाला आहे.
मेट्रोच्या कारशेडसाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे. कारशेड उभारण्यासाठी आरेतील वृक्ष कापले जाऊ नयेत, यासाठी शिवसेना, मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर भाष्य करताना अश्विनी भिडे यांनी आरेतील जागेची अपरिहार्यता स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. कारशेड म्हणजे केवळ मेट्रो गाड्यांच्या पार्किंगची जागा नाही. ही स्वयंचलित यंत्रणा आहे. या प्रक्रियेसाठी कारशेड हे मेट्रोचं महत्त्वपूर्ण केंद्र आहे. हे केंद्र दहा किलोमीटर लांब जाऊन चालणार नाही, असं मत भिडेंनी एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं.
अश्विनी भिडेंनी केलेल्या युक्तिवादावर मनसे नेते अनिल शिदोरेंनी निशाणा साधला. 'अडीच हजार झाडं तोडल्याशिवाय मेट्रो प्रकल्प होऊच शकत नाही हे तुमचं म्हणणं तर्कशुद्ध वाटत नाही. मूळ प्रकल्पाच्या संकल्पनेतच गफलत आहे. कमीत कमी झाडं तोडली जातील या विचारानं तुम्ही प्रकल्प आखलेला नाही. आधी प्रकल्प आखला आणि नंतर झाडं कशी वाचणार असं पहाता आहात,' अशा शब्दांमध्ये शिदोरेंनी भिडेंना उत्तर दिलं.
मनसेच्या टीकेला अश्विनी भिडेंनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. 'माझं म्हणणं जर तर्कशुद्ध नसेल, तर मुंबईत वेगवेगळ्या गृहप्रकल्पांसाठी व अन्य प्रकल्पांसाठी दिलेल्या वृक्षतोड परवानग्यादेखील तर्कशुद्ध नव्हत्या, हेही ठासून सांगायला हवं होतं. किंबहुना आता एकही वृक्ष तोडायचा नाही. भले आवश्यक एकही प्रकल्प आणि गृहनिर्मिती झाली नाही तरी चालेल हीच भूमिका घ्यावी,' असं भिडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.