तीन बैठकांना गैरहजर राहणाऱ्या पालिका उपायुक्तांच्या विरोधात पी दक्षिण वॉर्डची प्रभाग समिती झाली तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:07 AM2021-02-14T04:07:07+5:302021-02-14T04:07:07+5:30
मुंबई : महापालिका पी दक्षिण वॉर्डच्या प्रभाग समितीच्या सलग तीन बैठकांना परिमंडळ ४ चे पालिका उपायुक्त भारत मराठे गैरहजर ...
मुंबई : महापालिका पी दक्षिण वॉर्डच्या प्रभाग समितीच्या सलग तीन बैठकांना परिमंडळ ४ चे पालिका उपायुक्त भारत मराठे गैरहजर राहिल्याच्या निषेधार्थ समितीची शुक्रवारची बैठक आक्रमक नगरसेवकांनी तहकूब केली.
प्रभाग क्रमांक ५८ चे भाजप नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांनी सभा तहकुबी मांडली. प्रभाग समिती अध्यक्ष हर्ष पटेल यांनी ही बैठक झाल्याचे जाहीर केले. भाजप नगरसेविका प्रीती सातम, भाजप नगरससेविका श्रीकला पिल्ले यांनी अनुमोदन दिले.
या बैठकीला उपायुक्त गैरहजर राहिल्याचे भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी लक्ष वेधत नाराजी व्यक्त केली. सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्यास नगरसेवक पद रद्द होते. तोच नियम उपायुक्तांना लावा अशी मागणी त्यांनी केली.
नागरिकांनी आपल्याला नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे आपल्या प्रभागामध्ये छोटी मोठी विकासाची कामे करीत असतात. या कामास प्रभाग समित्यामध्ये मंजुरी दिली जाते, तर काही कामांना विभाग कार्यालयातील सहायक आयुक्तांच्या, तर काही कामांना उपायुक्तांच्या मंजुरीची आवश्यकता असते. त्यामुळे समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने उपायुक्तांनी हजर राहणे आवश्यक असते. मात्र, उपायुक्त मराठे हे प्रभाग समितिच्या सलग तीन बैठकांना गैरहजर राहिल्यामुळे उपस्थित नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या बैठकीला पी दक्षिण वॉर्डचे संबंधित अधिकारी देखील गैरहजर आहेत. याकडे संदीप पटेल यांनी लक्ष वेधले असता त्यांना मेमो देण्यात येतील, असे पी दक्षिण वॉर्डचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी सांगितले, तर मग प्रभाग समितीच्या बैठकीला तीन वेळा गैरहजर राहणाऱ्या उपायुक्त मराठे यांच्यावर आपण करवाई करणार का? असा सवाल नगरसेवक संदीप पटेल यांनी विचारला. आपण या प्रकरणी पालिका आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-------------------------------------------