आर/ दक्षिण वॉर्ड स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार प्रभाग समिती अध्यक्ष शिवकुमार झा यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 07:49 PM2018-04-19T19:49:16+5:302018-04-19T19:49:16+5:30
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आर/ दक्षिण वॉर्ड स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे.माझ्यावर भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी या वॉर्डचा प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून सोपवलेली जबाबदारी व टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा तसेच सगळ्यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील पारदर्शी कामकाज करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आर दक्षिण वॉर्डचे नवनिर्वाचित प्रभागसमिती अध्यक्ष शिवकुमार झा यांनी दिली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आर/ दक्षिण वॉर्ड स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे.माझ्यावर भाजपाच्या जेष्ठ नेत्यांनी या वॉर्डचा प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून सोपवलेली जबाबदारी व टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा तसेच सगळ्यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील पारदर्शी कामकाज करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आर दक्षिण वॉर्डचे नवनिर्वाचित प्रभागसमिती अध्यक्ष शिवकुमार झा यांनी दिली.
आर/ दक्षिण विभागातील ज्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना मंजुरी मिळाली नाही ती मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०२२ पर्यंत सर्वांना स्वतःच्या मालकीचे घर मिळावे हे स्वप्न पाहिले आहे,ते स्वप्न साकारण्यासाठी माझे योगदान देणार" असल्याचे मत झा यांनी व्यक्त केले. या प्रभागसमिती अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यावर या प्रभागात आगामी एक वर्षांच्या काळात कोणते उपक्रम राबवणाऱ याबाबत त्यांनी लोकमतशी बोलतांना सविस्तर माहिती दिली.
महापालिकेचे अतिक्रमित भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने ताब्यात घ्यावेत अशी सूचनाही त्यांनी केली. आर/ दक्षिण प्रभाग समितीच्या अख्यारीत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, रस्त्यांवरील खड्डे-चर बुजवणे, रस्ते रुंदीकरण, नाल्यांचे नूतनीकरण त्यातील गाळ काढणे, मलनि:स्सारण वाहिन्या स्वच्छ करणे, त्यांची दुरुस्ती करणे जेणेकरून पावसाळ्यात पूरपरिस्थिती उद्भवणार नाही. पिण्याच्या पाण्याची व जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती,आवश्यक तिथे मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकून नागरिकांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती झा यांनी दिली.
मनोरंजन व खेळाच्या मैदानांच्या विकासाबाबत विभागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न कारेन असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
पावसाळ्यात उद्भवणा-या रोगांवर मात करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यासाठी प्रशासनास तत्पर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे झा यांनी सांगितले. पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात कीटकनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. विकास कामांचे प्रस्ताव प्रभाग समितीपुढे वेळेवर सादर करण्यात यावेत अशी सूचना त्यांनी प्रशासनास केली. ई- निविदा प्रक्रिया पूर्ण करूनच प्रस्ताव प्रभाग समितीमध्ये मंजुरीस आणावेत अशीही सूचना झा यांनी केली.
यावेळी शिवकुमार झा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह,भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,उपनगराचे पालक मंत्री व राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार,खासदार गोपाळ शेट्टी, महाराष्ट्र भाजप महामंत्री व आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर, आमदार भाई गिरकर,महापालिका गटनेते मनोज कोटक, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार, पक्षाचे अन्य नेते पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.