लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रत्येक व्यक्तीमध्ये काम करण्याची उर्मी असतेच. त्यातही समर्पित भावनेने व इतरांसमोर आदर्श निर्माण होईल, अशा रितीने कामकाज करणाऱ्यांचा गौरव होणे हे महत्त्चाचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या जागतिक व्यक्तिमत्त्वाच्या नावाने देण्यात येणारे प्रभाग समिती गौरव पुरस्कार हे चांगले कामकाज करणाऱ्यांसाठी ऊर्जेचा नवीन स्रोत ठरतील, असे उद्गार महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी काढले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार २०१९’ चे वितरण महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते, पालिका मुख्यालयातील सभागृहात शुक्रवारी करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून सचिन पडवळ (एफ/दक्षिण व एफ/उत्तर) यांना सन्मानित करण्यात आले, तर उत्कृष्ट सहायक आयुक्त म्हणून शरद उघडे (जी/दक्षिण) आणि किरण दिघावकर (जी/उत्तर) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्कृष्ट गुणवंत अधिकारी म्हणून उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना गौरवण्यात आले. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, धनादेश, शाल व तुळस प्रदान करून सन्मान करण्यात आला. प्रभाग समिती अध्यक्षांना रुपये ५० हजार, सहाय्यक आयुक्तांना ३० हजार रुपये, अधिकाऱ्यास ३० हजार रुपये, तीन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दहा हजार (एकूण ३० हजार) आणि तीन कामगारांना प्रत्येकी पाच हजार (एकूण १५ हजार) याप्रमाणे एकूण एक लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम पुरस्कार स्वरूपात प्रदान करण्यात आली.