मनोहर कुंभेजकर
मुंबई : संपूर्ण जग,आपला भारत देश, महाराष्ट्र तसेच आपली लाडकी मुंबापूरी गेली साडेतीन महिने कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला करत आहे. सुमारे सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेला उत्सव म्हणजे गणेशोत्सव. संपूर्ण मुंबई या उत्सवात 11 दिवस न्हाहून निघते.तर मुंबई महापालिका दरवर्षी गणेशोत्सवाची ज्य्यत तयारी करत असते.
मात्र या वर्षी या उत्सवात कोरोनाच्या महामारीचे संकट आहे.कोविड 19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव सध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय शासकीय स्तरावर घेण्यात आला असून त्याबाबत मार्गदर्शक सूचना देखिल जारी करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या महामारीचे संकट लक्षात घेता,पालिकेच्या के पश्चिम वॉर्ड मध्ये के पश्चिम वॉर्ड मध्ये एक प्रभाग एक सार्वजनिक गणपती योजना राबवा असे आवाहन या वॉर्डचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी येथील पालिकेच्या सर्वपक्षीय 13 नगरसेवक सुमारे 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि सर्व रहिवासी व मुख्यत: सर्व गणेशभक्तांना केले आहे.
सुमारे 6.5 लाख लोकवस्तीच्या या वॉर्ड मध्ये विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम हे तीन मोठे विभाग येतात.या वॉर्ड मध्ये 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दरवर्षी संकष्टीला विसर्जन होणारा आणि नवसाला पावणारा अंधेरीचा राजा हा या वॉर्ड मध्ये येतो.दरवर्षी लाखो गणेशभक्त अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात.तसेच वर्सोवा मेट्रो स्टेशन,मॉडेल टाऊन येथील स्वप्नाक्षय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डी. एन.नगर सार्वजनिक मंडळाचा महागणपती यांच्या दर्शनाला देखिल गणेश भक्तांची दरवर्षी गर्दी होते.
यावर्षी गणेश मूर्ती ही चार फूटांची असल्याने पालिकेतर्फे पुरेशा प्रमाणात कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असून पालिकेतर्फे सर्व सुविधा देखिल पुरवण्यात येणार आहे. तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच गणेश मूर्ती स्वीकारण्याचे पालिकेचे प्रायोजन आहे अशी माहिती विश्वास मोटे यांनी लोकमतला दिली. त्यामुळे गणेश भक्तांनी कृत्रिम तलावातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन विश्वास मोटे यांनी केले आहे.
पर्यावरणाचे रक्षण करून शाडूच्या मातीच्या मूर्त्या,घरगुती आरास व इतर बाबींचा उपयोग करून श्रीगणेशोत्सव साजरा करूया,एक प्रभाग एक सार्वजनिक गणपती योजना राबवूया असे आवाहन सहाय्यक आयुक्त मोटे यांनी शेवटी केले आहे.