दीपक मोहिते, वसईमहानगरपालिकेचा हा प्रभाग उच्चभ्रू असून गेल्या १० वर्षात या प्रभागातील विकासकामे मार्गी लागली. नगरपरिषदेच्या कार्यकालात महत्वाची कामे करण्यात आली. त्यामध्ये जलकुंभ उभारणे, जलवाहिन्या टाकणे, नाले रुंद करणे याचा त्यामध्ये समावेश आहे. जलकुंभाचे काम झाले असले तरी पाणी टंचाईच्या स्थितीमध्ये अद्याप फरक पडलेला नाही. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरीक त्रस्त आहेत. प्रभागामध्ये १५ ते १६ कोटी रु. विकास कामावर खर्च झाला. विकासाची कामे नियोजनबद्ध पद्धतीने झाल्यामुळे १०० फूटी रस्ता, उद्याने तसेच दररोज होणारी साफसफाईची कामे झाली.या प्रभागामध्ये करवसुलीचे कामही प्रभावीरित्या झाले. करदात्यांनाही आपल्या कराच्या बदल्यात नागरी सुविधा योग्य प्रमाणात मिळाल्यामुळे करदाते काहीसे समाधानी असले तरी पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागेल अशा विवंचनेत सापडले आहेत. सर्वाधिक हाल मुंबईला नोकरीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे होत असतात. एक किंवा दोन दिवसाआड येणाऱ्या पाण्यामुळे त्यांच दैनंदिन जीवनच पार बिघडून जाते. अनेक चाकरमान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटरचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी महिन्याकाठी ६०० ते ८०० रुपयांची पदरमोड करावी लागते. त्यामुळे या प्रभागातील करदात्यांमध्ये थोडी खुशी, थोडा गम असे वातावरण आहे. जोवर अतिरिक्त पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होत नाही तोवर पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता कमी आहे. सध्या उपलब्ध असलेले सूर्याचे पाणीही रेल्वे प्रशासनाच्या मनमानीपणामुळे वसई रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस असलेल्या परिसराला मिळू शकत नाही. रेल्वे ओलांडून जलवाहिनी नेण्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागल्यास या परिसरातील रहिवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
प्रभाग क्रमांक ५४मधील पाणीटंचाई कायमच
By admin | Published: March 01, 2015 11:06 PM